Sharad Pawar Ahilyanagar Visit : भाजपचे दिग्गज नेते आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी थेट राजकीय संघर्ष करणाऱ्या काँग्रेस नेत्या प्रभावती घोगरे यांच्या घरी जाऊन शरद पवार यांनी एक असा राजकीय संदेश दिला, ज्यामुळे अहिल्यानगरसह राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने शरद पवार यांच्या या भेटीकडे अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे.
शरद पवार (Sharad Pawar) आणि विखे परिवारातील राजकीय संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन नाही. विशेषतः नुकत्याच झालेल्या लोकसभा 2024 निवडणुकीमध्ये हा संघर्ष शिगेला पोहोचला होता. शिर्डी लोकसभा मतदारसंघात सुजय विखे पाटील यांचा पराभव शरद पवार राष्ट्रवादीचे नीलेश लंके यांनी केला. विखे पाटील परिवाराला हा पराभव चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. यामुळे विखे पाटील पिता-पुत्रांकडून शरद पवार आणि त्यांच्या पक्षाविरोधात अन् राजकीय हालचालींवर फटकेबाजी सुरू असल्याचे दिसते.
बुधवारी प्रवरानगर येथे रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी अहिल्यानगर दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी सुरुवातीपासूनच अनेक सूचक राजकीय संदेश दिले. या दौऱ्यात त्यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि अजित पवार राष्ट्रवादीचे (NCP) नेते दिलीप वळसे पाटील हे उपस्थित होते. विशेष म्हणजे तिघांनी एकाच वाहनातून प्रवास करत विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात एंट्री घेतल्याने जिल्ह्यात चर्चांना उधाण आले.
यानंतर शरद पवार यांनी थेट लोणी खुर्द येथे जाऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रभावती घोगरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. ही केवळ औपचारिक भेट नसून आगामी स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने एक मोठा राजकीय संदेश असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत प्रभावती घोगरे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात जोरदार लढत दिली होती. महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना बाळासाहेब थोरात आणि शरद पवार यांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. तर शिर्डी मतदारसंघात स्वतः शरद पवार यांनी सभा घेऊन त्यांच्यासाठी ताकद उभी केली होती.
या निवडणुकीत प्रभावती घोगरे यांना 60 हजार 965 मते मिळाली होती, तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी 1 लाख 20 हजार 482 मते मिळवत तब्बल 50 हजार 517 मतांनी विजय मिळवला होता. मात्र भाजपच्या या बलाढ्य नेत्याला थेट आव्हान देणाऱ्या प्रभावती घोगरे यांच्या घरी स्वतः शरद पवार जाऊन भेट देतात, यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी आतषबाजी करत शरद पवार यांचे जोरदार स्वागत केले. एकनाथ घोगरे आणि अरुंधती घोगरे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी उर्मिला घोगरे, सरपंच जनार्दन घोगरे, दत्तात्रेय घोगरे, आबासाहेब आहेर, ॲड. सुरेंद्र घोगरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे, शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि प्रभावती घोगरे यांनी एकाच वाहनातून प्रवास केला.
या वेळी शरद पवार यांनी माजी आमदार चंद्रभान घोगरे, शंकरनाना खर्डे आणि डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या आठवणींना उजाळा दिला. “आज बुधवार असून येथे बाजार भरतो,” असे सांगत लोणी परिसराशी असलेले जुने ऋणानुबंधही त्यांनी पुन्हा अधोरेखित केले. राजकीय विश्लेषकांच्या मते, वरवर साधी वाटणारी ही भेट प्रत्यक्षात अहिल्यानगर जिल्ह्याच्या आगामी राजकारणातील मोठ्या घडामोडींची नांदी ठरू शकते. विखे विरुद्ध पवार संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात या भेटीतून झाली का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.