Sharad Pawar & Sunita Charoskar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar : "नरहरी झिरवाळ विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाही, सुनीता चारोस्कर हजारपट भारी उमेदवार"

Dindori Assembly Elections: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी बंडखोर आमदार नरहरी झिरवाळ यांचा करेक्ट कार्यक्रम केला.

Sampat Devgire

Dindori News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज दिंडोरी येथे सभा झाली. या सभेत पवार यांनी बंडखोर उमेदवार नरहरी झिरवाळ यांचा करेक्ट कार्यक्रम केला. त्यांनी झिरवाळ हे मत देण्याच्या लायकीचे नाहीत, या एका वाक्यात त्यांचा निकाल लावला.

श्री पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुनीता चारोस्कर यांच्या प्रचारासाठी आज दिंडोरी येथे सभा झाली. या सभेत पवार यांनी बंडखोर आमदार नरहरी झिरवाळ यांचा अक्षरशः पंचनामा केला. झिरवाळ हा माणूस मत देण्याच्या पात्रतेचा नाही. त्याला मतदान करू नका, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

श्री पवार यांनी नरहरी झिरवाळ यांच्या वर्तणुकीचे विविध दाखलेच यावेळी दिले. ते म्हणाले, 2019 मध्ये आम्ही त्यांना उमेदवारी दिली. निवडून आल्यावर ते अचानक गायब झाले. मुंबईत, दिंडोरीत त्यांचा शोध घेऊनही ते सापडले नाही. श्रीराम शेटे यांच्याकडे चौकशी केल्यावरही त्यांची माहिती मिळू शकली नाही.

आम्ही दिल्लीत शोधल्यावरही ते सापडले नाही. तपास केल्यावर ते गुडगावला एका पंचतारांकित हॉटेलच्या खोलीत सापडले. यावेळी ते सिनेमा पाहत होते. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून माझ्या दिल्लीतील घरी आणले. यावेळी त्यांनी गयावया केल्यावर हा गरीब माणूस आहे. आदिवासी माणूस आहे. म्हणून त्याची चूक आम्ही पोटात घेतली. राज्यात सरकार आल्यावर आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, म्हणून मी स्वतः त्यांना विधानसभेचे उपाध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला. त्यांना पद दिले.

मात्र पुन्हा संधी मिळताच त्यांनी बंडखोरी केली. ते आम्हाला सोडून गेले. आज पुन्हा ते दिंडोरीच्या मतदारांकडे मते मागत आहेत. त्यांच्यावर भरोसा ठेवायचा नाही. हा माणूस कधी पळेल, काय करेल आणि कुठे जाईल याची खात्री नाही. झिरवाळ त्यांच्यापेक्षा आमच्या उमेदवार सुनीता चारोस्कर हजार पटीने चांगल्या आहेत. त्या प्रामाणिकपणे काम करतील. मतदारांसाठी कष्ट घेतील. त्यांना मतदान करा आणि दिंडोरी मतदार संघाच्या आमदार करा, असे आवाहन पवार यांनी केले.

शरद पवार यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार व बंडखोर झिरवाळ यांच्या विषयी अतिशय गंभीर विधाने केली. उपस्थित मतदार आणि कार्यकर्त्यांनी त्याला जोरदार प्रतिसाद देत झिरवाळ यांच्या विरोधात घोषणा दिल्या. या सभेचा शेवट नाट्यमयरीत्या झिरवाळ यांना धक्का देणारा ठरला.

झिरवाळ यांच्या विषयी शरद पवार काय भूमिका घेणार, काय वक्तव्य करणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. शरद पवार यांनी झिरवाळ यांचा घेतलेला समाचार या निवडणुकीला नवे वळण देणारा ठरला. दिंडोरी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तर पेठ परिसरात डाव्या आघाडीचा प्रभाव आहे. हे मतदार सध्या महाविकास आघाडीकडे आहेत. त्यामुळे आज झालेली श्री पवार यांची सभा झिरवाळ यांच्यासाठी अडचणीची ठरणार, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

आमदार झिरवाळ हे निवडणुकीदरम्यान सातत्याने मतदार आणि कार्यकर्त्यांचा संभ्रम होईल, अशी विधाने करीत आले आहेत. मला श्रीराम शेटे यांचे आशीर्वाद आहेत. शरद पवार हे देखील माझ्यासोबतच आहेत. अशा विविध प्रकारची विधाने त्यांनी केली होती. शरद पवार यांनी आपल्या सभेत एका फटक्यात झिरवाळ यांना उघडे पाडले आहे. त्यामुळे पवार यांची ही सभा दिंडोरी मतदारसंघाच्या निवडणुकीचे वातावरण बदलण्यात महत्त्वाची ठरली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT