Nilesh Lanke, Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar: शरद पवार अन् आमदार लंकेंचा एकमेकांना पुन्हा 'चकवा'

Pradeep Pendhare

Nagar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त सकाळी सुरू होते. मात्र, शरद पवार आणि आमदार नीलेश लंके यांनी आज पुन्हा एकमेकांना चकवा दिला. त्यामुळे आमदार लंकेच्या भूमिकेबाबत जेवढी उत्सुकता वाढली आहे, तेवढा संभ्रमदेखील निर्माण झाला आहे. शरद पवार यांनीदेखील आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार लंके यांच्या पक्ष प्रवेशाचा विषय एका वाक्यात संपवला. त्यामुळे आमदार लंके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाचा राजकीय संभ्रम कायम राहिला आहे.

आमदार नीलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. या चर्चेवर आमदार लंके यांनी काही भाष्य केले नसले तरी, त्यांनी राजकीय भूमिका गुलदस्तात ठेवून राजकीय उत्सुकता ताणून ठेवली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार लंके यांच्या भोवती गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा वावर वाढला आहे. नगरमध्ये त्यांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यात शिवपुत्र संभाजी हे महानाट्य घेतले. हा ऐतिहासिक वारसा असून, यामागे सामाजिक आणि सांस्कृतिक भूमिका असल्याचे आमदार लंके यांनी सांगितले. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात हा सांस्कृतिक कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यानिमित्ताने त्यांच्या व्यासपीठावर महाविकास आघाडीचे नेते अधिक होते. त्यामुळे आमदार लंके यांच्या शरदचंद्र पवार पक्षात येणार अशा चर्चेला बळ मिळाले.

लंके हातात नक्कीच तुतारी घेणार?

आमदार लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जाणार, या चर्चेला बळ मिळत असतानाच 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचे प्रमुख अभिनेता खासदार अमोल कोल्हे यांनीदेखील आमदार लंके यांनी दिल्लीत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी फुंकावी, अशी साद घातली. यामुळे आमदार लंके यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चांना अधिकच उधाण आले. या महानाट्याच्या कार्यक्रमानंतर आमदार लंके यांचा काल वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने झाला. परंतु आमदार लंके यांच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली अब दूर नही.., अशा स्वरूपाची जाहिरातबाजी केली. त्यामुळे आमदार लंके हातात नक्कीच तुतारी घेणार, अशा चर्चांना अधिकच बळ मिळाले. आमदार लंके हे काल वाढदिवस साजरा करत नाही तोच, ते आज सकाळी पुण्याकडे रवाना झाले. याच दरम्यान, पुण्यात शरद पवार यांनी पत्रकार परिषद बोलावली. त्यामुळे आमदार लंके हे शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताला बळ मिळाले. तशा वृत्तवाहिन्यांवर वृत्तदेखील झळकले. परंतु हे वृत्त काही औट घटकेचे ठरले. त्यामुळे शरद पवार आणि आमदार लंके यांनी एकमेकांना पुन्हा एकदा चकवा दिला, अशी चर्चा आता नगर जिल्ह्यात रंगली आहे.

पुन्हा पक्षात घ्याल का?

शरद पवार यांना पत्रकार परिषदेत आमदार नीलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशावर विचारल्यावर हे तुमच्याकडून कळाले, असे हजरजबाबी उत्तर त्यांनी दिले. शरद पवार म्हणाले, 'त्या चर्चेला अर्थ नाही. तथ्यहीन आहेत'. यावर त्यांना पक्षात प्रवेशासाठी विचारणार का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, 'असे अनेक लोकं आहेत. त्यांना विचारात बसणार का?, असा प्रतिप्रश्न उपस्थित केला'. नीलेश लंके आज पक्ष प्रवेश करणार, अशी चर्चा होती. यावर शरद पवार यांनी मला माहीत नाही. हेदेखील आजच तुमच्याकडून कळाले, असे सांगताच पत्रकार परिषदेत हशा झाला. गेलेल्यांपैकी पक्षात येण्यासाठी किती संपर्कात आहेत, यावर शरद पवार म्हणाले, "आम्ही त्या उद्योगात नाही. अनेक लोक, असे आहेत की, हे जे काही चालेले आहेत, ते योग्य वाटत नाही. ते अस्वस्थ आहेत". गेलेले पुन्हा येण्यास इच्छुक असल्यास त्यांना पुन्हा पक्षात घ्याल का? यावर शरद पवार यांनी 'कोण, काय त्याची माहिती द्या, नंतर पाहू', असे म्हणत विषय संपवला.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT