Sharad Pawar Rahuri Visit Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar Rahuri Visit : प्राजक्त तनपुरेंनी अंतर ठेवलं, पण शरद पवार थेट राहुरीत; अहिल्यानगर दौऱ्यात मोठे संकेत!

Sharad Pawar sudden stop Rahuri during Ahilyanagar visit sparks fresh political speculation over Prajakt Tanpure and changing Maharashtra equations : अहिल्यानगर दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी राहुरीत प्राजक्त तनपुरे यांच्या राजकीय बालेकिल्ल्यात थांबून कार्यकर्त्यांनी स्वीकारलेला सत्कार आगामी राजकीय संकेत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Pradeep Pendhare

Sharad Pawar Ahilyanagar Visit : शरद पवार यांनी बुधवारी अहिल्यानगर दौऱ्यात अशी एक राजकीय खेळी केली, ज्याची चर्चा आता संपूर्ण राज्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. भाजप नेते आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात थेट दाखल होत पवारांनी अनेक सूचक राजकीय संदेश दिले.

प्रवरानगर येथे रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी आलेल्या शरद पवारांनी केवळ उपस्थितीच लावली नाही, तर त्यांच्या प्रत्येक हालचालीतून राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळू शकते, असे संकेत दिले.

विशेष म्हणजे, भाजपकडे राजकीय वाटचाल सुरू केलेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्याच राहुरी मतदारसंघात पवारांनी अचानक थांबत कार्यकर्त्यांचा जंगी सत्कार स्वीकारला आणि याच घटनेने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राहुरी शहरात शरद पवार (Sharad Pawar) यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. जोरदार घोषणाबाजी, पुष्पगुच्छ आणि उत्साही स्वागतामुळे संपूर्ण परिसर काही काळ राजकीय शक्तिप्रदर्शनाचे केंद्र बनला. शरद पवार यांनी देखील वाहन थांबवत कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. काही कार्यकर्त्यांची थेट नावं घेत संवाद साधल्याने उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.

या स्वागतावेळी खासदार नीलेश लंके हे देखील शरद पवारांसोबत उपस्थित होते. तसेच अमृत धुमाळ, रावसाहेब चाचा तनपुरे, किरण कडू, अशोक कदम आणि ॲड. पंढरीनाथ पवार यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांनी पवारांचे स्वागत केले. राजकीय वर्तुळात चर्चेचा मुख्य मुद्दा म्हणजे प्राजक्त तनपुरे यांची बदललेली राजकीय भूमिका!

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीनंतर आणि पुढे विधान परिषद निवडणुकीदरम्यान तनपुरे यांनी भाजपशी जवळीक वाढवत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. प्राजक्त तनपुरेंच्या या निर्णयामागे भाजप नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्याचे पुत्र माजी खासदार सुजय विखे पाटील यांची राजकीय भूमिका असल्याचे आता उघड सत्य झालेलं आहे.

पवार अन् पाटलांची भेट टाळली

विशेष म्हणजे, पक्ष सोडण्यापूर्वी तनपुरे यांनी शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट टाळून, नेत्या सुप्रिया सुळे यांची भेट बाजू मांडली. या वेळी पवार साहेब आणि नात्याने मामा लागत असलेले जयंत पाटील यांची भेट टाळल्याचे स्वतः कबुलीही यापूर्वी दिलेली आहे.

राहुरीत सत्कार घेण्यामागे सूचक संकेत

अशा परिस्थितीत, अहिल्यानगर दौऱ्यात राहुरीत अचानक थांबून कार्यकर्त्यांचा सत्कार स्वीकारण्याचा शरद पवारांचा निर्णय हा केवळ स्वागताचा कार्यक्रम नव्हता, तर तो प्राजक्त तनपुरे आणि स्थानिक राजकारणाला दिलेला स्पष्ट राजकीय संदेश होता का, याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा हा दौरा आणि राहुरीतील काही मिनिटांचा हा थांबा आगामी काळात मोठ्या राजकीय घडामोडींचा संकेत ठरतो का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT