Chandrakant Patil & Dada Bhuse
Chandrakant Patil & Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

दादा भुसे आपलेच पालकमंत्री आहेत...त्यांच्याकडे हक्काने जा..!

Sampat Devgire

नाशिक : राज्यात (Maharashtra) शिंदे गट (Shinde Group) व भारतीय जनता पक्षाचे (BJP) सरकार स्थापन झाले, तरी स्थानिक पातळीवर अशा प्रकारच्या युतीचे (political alliance) रसायन पदाधिकाऱ्यांच्या मनापर्यंत पोचलेले दिसत नाही त्यातूनच पालकमंत्री बदलल्यानंतर खटके अधिक वाढताना दिसत आहे. (There are disputes on local lavle in Shinde Group & BJP)

या वाढत्या नाराजीच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दादा भुसे यांचे नाव न घेता पालकमंत्री आपलेच असून, त्यांच्याकडे हक्काने कामे घेऊन जा, असा सल्ला दिला.

जूनमध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उलथवून एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह स्वतंत्र सावतासुभा मांडला. अर्थात, त्याला भाजपची साथ मिळाली. त्यामुळे राज्यात शिंदे गट व भारतीय जनता पक्षाचे सरकार येऊन शिंदे मुख्यमंत्री झाले. राज्यात सरकार स्थापन झाले तरी मंत्रिपदाचे खातेवाटप व त्यानंतर पालकमंत्री पदाचा घोळ दोन महिने सुरू होता.

गेल्या महिन्यात पालकमंत्री पदाची घोषणा करण्यात आली. त्यात नाशिकचे पालकमंत्री पद शिंदे गटाच्या वाट्याला आले. खनीकर्ममंत्री दादा भुसे यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्री पद आल्याने भाजपमध्ये महत्त्वाकांक्षा बाळगून असलेल्या अनेकांना धक्का बसला. तेथून शिंदे गट व भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खटके उडण्यास सुरवात झाली. पालकमंत्री भुसे यांनी पद स्वीकारल्यानंतर दोन बैठका घेतल्या. त्यात भाजपच्या आमदारांना बरोबर घेतले नाही.

महापालिकेसंदर्भात निर्णय घेतानाही भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विचारले नाही. त्यामुळे अंतर्गत वादाचा फटका अधिक बसला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेश पातळीवर वरिष्ठ नेत्यांकडे नाराजी प्रकट करताना आगामी महापालिका निवडणुकीत भाजपची पीछेहाट होऊन शिंदे गट पुढे जायला नको, अशी शंका व्यक्त केली. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री व भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

पक्षाच्या वसंत स्मृती कार्यालयात बुधवारी श्री. पाटील यांनी भेट दिली. त्या वेळी नाशिकचे पालकमंत्री बाळासाहेबांच्या शिवसेनेचे असले तरी ते आपलेच आहेत, असे सांगताना त्यांच्याकडे हक्काने जाण्याचा सल्ला दिला. शहरातील तीन व ग्रामीणमधले दोन आमदार भाजपचे आहेत, त्यांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन त्यांनी केले.

निवडणुकांसाठी सज्ज व्हा

विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर २०२४ मध्ये होत आहे. त्यामुळे कमी कालावधी असल्याने आपल्याला नागरिकांना फक्त आश्वासने नाही, तर विकासकामे करून दाखवायची आहेत. त्यामुळे विकासकामे नागरिकांपर्यंत पोचवण्याचे आवाहन त्यांनी केले. २०१९ मध्येच भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आले होते. परंतु भाजपशी गद्दारी झाली. युतीचे १६१ व अपक्ष १९ मिळून १८० इतके सदस्यांचे संख्याबळ होते. असे असतानाही ठाकरेंनी घात केल्याने सत्ता स्थापन करता आली नाही.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरवातीपासून ज्यांचा विरोध केला त्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेत उद्धव ठाकरे यांनी घरोबा केला. त्यामुळे हिंदुत्वाबरोबरच विकासकामे करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत येणे गरजेचे होते. सत्ता आल्यापासून विविध लोकोपयोगी निर्णय सरकारने घेतल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

आमदार प्रा. देवयानी फरांदे, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT