Shirish Choudhary, Dhananjay Choudhary & Madhukar Choudhary Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shirish Chaudhari Politics: काँग्रेस नेते शिरीष चौधरी यंदा थांबणार?, मुलगा धनंजय विधानसभेच्या मैदानात!

Sampat Devgire

दिलीप वैद्य

Raver constituency: रावेर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने यंदा जोर लावला आहे. भाजपची लढत जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार शिरीष चौधरी यांच्याशी असेल. त्यामुळे या मतदार संघाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

जळगाव जिल्ह्यात आमदार चौधरी (रावेर) हे काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. हा स्वातंत्र्यसैनिक आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष (कै) मधुकरराव चौधरी यांचा परंपरागत मतदार संघ आहे. या मतदारसंघावर आजही चौधरी यांचा प्रभाव आहे. त्यामुळे काँग्रेससाठी ही निवडणूक सोपी मानली जाते.

भारतीय जनता पक्षाची विधानसभा निवडणुकीची आढावा बैठक मंगळवारी येथे झाली. यावेळी मतदार संघातील बुथ रचना आणि राजकीय आढावा घेण्यात आला. माजी मंत्री जयकुमार रावल निरीक्षक म्हणून उपस्थित होते.

भाजपने या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे मतदारसंघातून कोणत्या उमेदवाराला निवडणूक सोपी असेल यापासून तर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मतप्रवाह काय आहे, याची देखील चाचणी करण्यात आली. यावेळी प्रमुख पदाधिकारी आणि मतदारसंघातील लोकप्रतिनिधींचे मतदान घेण्यात आले.

या मतदानात तीन पर्याय सुचविण्याचे आवाहन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाकडे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव आणि लोकसभा निवडणुकीतील इच्छुक अमोल जावळे यांनी उमेदवारी मागितली आहे. याशिवाय कुंदन फेगडे आणि डॉक्टर केतकी पाटील हे अन्य इच्छुक आहेत.

उमेदवारीचा निर्णय आता प्रदेश स्तरावर होणार आहे. भारतीय जनता पक्षाने जोरदार ताकद लावली असली तरी, काँग्रेस पक्ष बेसावध नाही. आमदार चौधरी यांचा मतदारसंघात चांगला संपर्क आहे. सध्या प्रकृतीमुळे आमदार चौधरी यांनी चिरंजीव धनंजय चौधरी यांना प्रोजेक्ट करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

काँग्रेसमध्ये त्यांच्या उमेदवारीला फारसा विरोध नाही. काँग्रेसचे अन्य इच्छुक व माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनाही त्याची जाणीव आहे. त्यामुळे आमदार चौधरी यांनी मतदारसंघ व कार्यकर्ते यांच्याकडे चाचपणी केली आहे. त्यांचा एक दौरा देखील झाला.

माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार गटात प्रवेश करण्याचे जाहीर केले होते. स्थानिक पदाधिकाऱ्यांसह प्रवेशाची तयारी देखील केली होती. मात्र उपमुख्यमंत्री पवार यांनी ते इच्छुक असल्याने त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला.

हा प्रवेश आता थांबला आहे. महायुतीकडे रावेत मतदार संघ दीर्घकाळ भाजपकडे राहिला आहे. येथून भाजपचा उमेदवार उमेदवारी करतो. यंदाही महायुतीच्या अन्य पक्षांनी रावेर मतदारसंघावर दावा केलेलं नाही. त्यामुळे आगामी निवडणूक काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच होण्याची चिन्हे आहेत.

यामध्ये अल्पसंख्यांक मतांचा प्रभाव असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे दारा मोहम्मद हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. या मतदारसंघातून २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने गफ्फार मलिक यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांना अवघी ३३ हजार मते मिळाली होती.

अल्पसंख्यांक मतांच्या आधारावर निवडणूक जिंकणे अवघड आहे. अल्पसंख्यांक उमेदवार उभा राहिल्यास मत विभागणी होऊन त्याचा भाजपला फायदा होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर काँग्रेसला अधिक जागरूकपणे पावले टाकावी लागतील. सर्वांना बरोबर घेण्यासाठी मर्जी सांभाळावी लागेल.

या राजकीय स्थितीची जाणीव आमदार चौधरी यांना देखील आहे. यंदा येथून त्यांचे सुपुत्र धनंजय चौधरी यांच्या उमेदवारीसाठी त्यांचे प्रयत्न आहेत. (कै) मधुकरराव चौधरी यांची ही तिसरी पिढी या निमित्ताने राजकारणात येईल. रावेर मतदार संघाच्या निवडणुकीला त्यामुळेच विशेष महत्त्व आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT