Wet Drought Demand Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Wet Drought Demand : शिवसेनेचे मंत्री टाकणार कॅबिनेटवर दबाव, ओला दुष्काळ जाहीर करण्याची एकमुखाने मागणी करणार

Shiv Sena ministers : राज्यभरात अतिवृष्टीने कहर केला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ganesh Sonawane

Wet Drought : अतिवृष्टीमुळे संपूर्ण राज्यात जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष करुन विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज मंगळवार (दि. २३) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होणार आहे. शिवसेनेचे सर्व मंत्री एकमुखाने ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करणार आहे.

मराठवाड्याप्रमाणेच जळगाव जिल्ह्यातही ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी आम्ही कॅबिनेट बैठकीत करणार आहोत अशी माहिती शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. मराठवाड्यासारखीच जळगावची परिस्थिती आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत अतिवृष्टी सारखी परिस्थिती आहे. अनेक तालुक्यांत ढगफुटी सदृश परिस्थिती असून, शेती पिकांचे आणि जनावरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात 'ओला दुष्काळ' जाहीर करण्यात यावा, अशी मागणी कॅबिनेट बैठकीत करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

पाटील पुढे म्हणाले की, ओला दु्ष्काळ जाहीर करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. निधीच्या वाटपासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झालेली असून त्यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे. पुढील पाच दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याने सर्वांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले.

दरम्यान पावसामुळे झालेल्या पिकांच्या आणि जमिनीच्या नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना दिले जाईल असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी स्पष्ट केलं होतं. ओला दुष्काळावर आजच्या कॅबिनेट बैठकीत निर्णय होईल असं ते म्हणाले होते. त्यामुळे आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सरकार 'ओला दुष्काळ' जाहीर करते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही यावरुन सरकारला लक्ष्य केलं आहे. राज्यभरात अतिवृष्टीमुळे इतके मोठे नुकसान होऊनही अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री अद्यापही प्रत्यक्ष पाहणीस गेलेले नाहीत. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरु झालेले नाही, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. कॅबिनेट बैठकीत सर्व मंत्र्यांना आपआपल्या जिल्ह्यात जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश देण्यात यावेत असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT