Vasant Gite Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Shivsena Politics: शहरातील वाहतूक नियोजनाला राजकीय वळण!

Vasant Gite Suggest Options for Traffic Issue: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते वसंत गिते यांचा सर्कलचा घेर कमी करण्यास विरोध

Sampat Devgire

Nashik Politics : शहरातील मुंबई नाका परिसरात वाहतूक ठप्प होत असल्याने रस्ता सुरक्षा समितीने सर्कलचा घेर कमी करण्याची सूचना केली आहे. त्याला शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने विरोध केला आहे. त्याऐवजी अंडरपास व बायपास तयार करण्याची मागणी माजी आमदार वसंत गिते यांनी केल्याने आता या विषयाला राजकीय वळण लागले आहे. (Ex. MLA Vasant Gite deemands Underpass for traffic congestion)

नाशिक (Nashik) शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. महामार्गावरील मुंबई नाका भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी अंडरपास करावेत अशी मागणी शिवसेनेचे (Shivsena) (ठाकरे गट) (Uddhav Thackeray) माजी आमदार वसंत गिते (Vasant Gite) यांनी केली आहे.

या वाहतूक बेटामध्ये महात्मा फुले दाम्पत्याचा पुतला बसविण्यासाठी सत्तेत सहभागी असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच घेर कमी करण्याची भूमिका घेतली आहे. मुंबई नाका येथील सर्कल कमी करण्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार गिते यांनी महापालिकेच्या आयुक्त भाग्यश्री बानायत यांची भेट घेऊन भूमिका मांडली. माजी नगरसेवक प्रशांत दिवे या वेळी उपस्थित होते.

मुंबई नाका सर्कल परिसर वाहतुकीच्या दृष्टीने शहरातील सर्वांत मोठा ब्लॅक स्पॉट ठरला आहे. सायंकाळी सहा ते आठ, यादरम्यान सर्वाधिक वाहतूक ठप्प होत असल्याचा अहवाल रस्ता सुरक्षा समितीने नियुक्त केलेल्या रेडिएडंट या एजन्सीने सर्वेक्षणाअंती दिला. त्यामुळे वाहतूक कमी करण्यासाठी मायलन सर्कलचा घेर कमी करण्याबरोबरच या भागात सरळ मार्गाने महामार्गाकडून येणाऱ्या वाहतुकीच्या नियोजनासाठी सिग्नल बसविण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस व समता परिषदेच्या आंदोलनानंतर मायलन सर्कलच्या मधोमध महात्मा फुले दांपत्याचा पुतळा बसविला जाणार आहे.

पुतळा तयार होण्यास वेळ लागणार असल्याने त्यापूर्वी सर्कलचा घेर कमी करण्याचे काम केले जाणार आहे. परंतु सर्कलचा घेर कमी केल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटण्याएवजी उलट वाढेल. सर्कलला वळसा घेण्याचा वेळ कमी होईल व त्यातून वाहतूक अधिक ठप्प होईल, असा दावा माजी आमदार गिते यांनी करताना त्याऐवजी पुणे व पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर अंडरपास व बायपासचे पर्याय सुचविले.

मुंबई नाका परिसरात शहरातील अकरा रस्ते येऊन मिळतात. वाहतूक सुरळीत होण्यासाठी सर्कलचा घेर कमी करणे हा उपाय नाही, उलट वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वाढतील. अंडरपास व बायपास हा त्यावर उपाय आहे.

- वसंत गिते, माजी आमदार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT