Shivsena Agitation at Shirpur Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिवसेना नेत्यांनी शिरपूरला रस्त्यावर टरबूज का फोडले?

शिरपूर येथे शिवसेना आमदारांच्या बंडाळीच्या निषेधार्थ टरबूज फोडून निषेध करण्यात आला.

Sampat Devgire

धुळे : ‘या चिमण्यांनो, परत फिरा रे, घराकडे अपुल्या...’ हे जिव्हाळा चित्रपटातील ग. दि. माडगूळकरांचे अजरामर गीत. घरापासून दूर टेकडीवर निघून गेलेल्या आपल्या पोरांना ‘तिन्ही सांजा जाहल्या, आता घराकडे परत फिरा...’ अशी मायेची साद घालणारे, तितकेच आशयगर्भ गीत. राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय स्थितीला अनुसरून नेमके भाष्य करणारे... अगदी त्याच पद्धतीने जिल्ह्यातील (Dhule) शिवसैनिकांनी (Shivsena) बंडखोरी केलेल्या आपल्या जिल्ह्यातील आमदारांना साद घातली आहे. आमदारांना परत येण्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांना समर्थन देण्याचे आवाहन केले. (Shivsena workers agitation at Shirpur against Rebel MLAs)

राज्यात चाललेल्या राजकीय नाट्यमय घडामोडींचे पडसाद शनिवारी जिल्हाभर उमटले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक रस्त्यावर आले. साक्री, दोंडाईचात भक्तीयात्रा काढण्यात आली. तर शिरपूरमध्ये शिवसेना आमदारांच्या बंडखोरीचा निषेध व्यक्त करत रस्त्यावर टरबूज फोडण्यात आले. दरम्यान, साक्रीतील भक्तीयात्रेत शिवसैनिकांनी आमदार मंजुळा गावित यांच्यासह बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन केले आहे.

शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिरपूर येथे टरबूज फोडून निषेध केला. मुख्यमंत्री ठाकरे व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा जयघोष करून त्यांना समर्थन देण्यात आले. साक्रीत शिवसैनिकांनी भक्तीयात्रेत मुख्यमंत्री ठाकरे यांचे समर्थन केले. साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, त्यांचे पती जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित हे देखील गुवाहाटीत पोचलेले आहेत. त्यांना, तसेच बंडखोरी केलेल्या आमदारांना देखील परतण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले. दोंडाईच्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचा निर्धार केला.

बॅनर उतरवले; धुळ्यात आज मोर्चा

साक्री तालुक्यामधील शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावित, त्यांचे पती शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित यांच्यासह महानगरप्रमुख सतीश महाले यांनीही हीच वाट धरली. धुळ्यात देवपुरात महाले यांनी गटनेते एकनाथ शिंदे समर्थनार्थ लावलेले बॅनर शनिवारी शिवसेनेचे ठाकरे समर्थक पदाधिकारी, कार्यकर्ते फाडण्यासाठी गेले. पोलिसांनी हस्तक्षेप करत बॅनर काढून घेतला. ठाकरे समर्थनार्थ आणि बंडखोर आमदार, मंत्र्यांविरोधात येथील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी शनिवारी बैठक घेतली व त्यात सोमवारी (ता. २७) शहरात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी आमदार गावित यांच्या धुळे शहरातील निवासस्थानी सुरक्षाव्यवस्था वाढविली आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT