Sanjay Raut & Anil Gote Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut Politics: संजय राऊत यांना शिवसेनेवर भरोसा नाय काय?.. अनिल गोटे यांच्याशी उमेदवारीची चर्चा?

Shivsena Politics; ShivSena does not believe in own leaders? Anil Gote is Sanjay Raut's choice?-महाविकास आघाडी, शिवसेनेला टाळून खासदार राऊत यांची पसंती माजी आमदार अनिल गोटे यांना?

Sampat Devgire

Dhule constituency News: धुळे शहरातील विधानसभा निवडणुकीचे राजकारण पुन्हा एकदा गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्यात त्यांनी वेगळेच संकेत दिलेत. त्यामुळे उमेदवार कोण? याची चर्चा सुरू झाली.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काल धुळे शहराचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. निवडणुकीत उमेदवार कोण? हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश होता. मात्र त्यांच्या या दौऱ्यात शिवसेनेच्या नेते आणि इच्छुक उमेदवार यांच्याऐवजी खासदार राऊत यांनी वेगळेच राजकीय संकेत दिले.

खासदार राऊत यांनी यावेळी माजी आमदार गोटे यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. सुमारे वीस मिनिटे ही चर्चा झाली. खासदार राऊत यांना भेटण्यासाठी माजी आमदार गोटे थेट रुग्णालयातून आले होते.

माजी आमदार गोटे आणि धुळे विधानसभा मतदारसंघातील निवडणूक हे एक समीकरण आहे. गोटे विविध निवडणुकांना उमेदवारी करतात. गेल्या निवडणुकीत त्यांना फारसा प्रभाव दाखवता आला नव्हता. शिवसेनेच्या निर्णयामुळे अन्य पक्षांचीही अडचण झाली होती.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना युती होती. मात्र भाजपने धुळे मतदारसंघात शिवसेनेएैवजी वेगळ्याच उमेदवाराला मदत केल्याची चर्चा आहे. परिणामी मत विभागणीचा फायदा `एमआयएम`चे फारुक शहा यांना मिळाला.

`एमआयएम` या पक्षाचे सध्या राज्यात दोन आमदार आहेत. यातील एक धुळे शहरातील आहे. मत विभागणीमुळे तीन हजार ३०७ मताधिक्क्याने आमदार शहा निवडून आले होते. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार थेट चौथ्या क्रमांकावर राहिले. अपक्ष राजवर्धन कदमबांडे दुसऱ्या क्रमांकावर होते.

गेली पाच वर्ष धुळे शहरातील विविध सत्तास्थाने आणि महापालिकेत भाजप सत्तेत आहे. भाजपशी शहरातील प्रश्न आणि नागरिकांच्या समस्येवर शिवसेनेने संघर्ष केला आहे. शिवसेनेत अनेक इच्छुक उमेदवार आहेत.

यामध्ये प्रामुख्याने जिल्हाप्रमुख माजी आमदार शरद पाटील, महानगर प्रमुख डॉ सुशील महाजन, सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री हे इच्छुक आहेत. या सगळ्यांनी गेले काही दिवस शहरात निवडणुकीची तयारी केली आहे. पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाही हा मतदार संघ हवा आहे. माजी महापौर कल्पना महाले, शहराध्यक्ष रणजीत भोसले, सचिन दहिते यांचा विविध इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. काँग्रेस पक्षातही इच्छुक आहेत. समाजवादी पक्षानेही महाविकास आघाडीकडे हा मतदारसंघ मागितला आहे.

महाविकास आघाडीतच अनेक इच्छुक आणि प्रबळ उमेदवार आहेत. यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष प्रभावीपणे निवडणुकीत उतरण्याची तयारी करीत आहे. खासदार राऊत यांच्या दौऱ्यात मात्र या सगळ्यांनाच नाउमेद करण्यात आले. खासदार राऊत यांना आपल्याच पक्षाच्या पदाधिकारी आणि इच्छुकांवर विश्वास नाही काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

माजी आमदार गोटे यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा, असे प्रयत्न खासदार राऊत यांचा आहे. राऊत यांच्या या डावपेचांमुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये वेगळाच संदेश गेला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. खासदार राऊत यांना महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष यापेक्षा अनिल गोटे हे अधिक प्रभावी कसे वाटू लागले, असा प्रश्न पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT