NMC Building

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

भाजपला भिडण्यासाठी शिवसेनेचे यंदा खानदेशी कार्ड?

महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या भाऊगर्दीची शक्यता

Sampat Devgire

नाशिक : आगामी महापालिका (NMC) निवडणुकांसाठी पाथर्डी गावातून मोठ्या संख्येने इच्छुक तयारीला लागले आहेत. या भागातील एकगठ्ठा मतदानाचा नेमका कसा आणि कुणाला फायदा होतो, की फटका बसतो याची चर्चा आहे. त्यात निम्मा शहरी भाग आहे. तेथे अहिराणी भाषिक मतदार आहेत. त्यामुळे भाजपला (BJP) दमवण्यासाठी शिवसेना (Shivsena) यंदा खानदेशी उमेदवार देणार का याची चर्चा आहे.

यंदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये तुल्यबळ लढत अपेक्षित आहे. त्यातही शिवसेनेसाठी ग्रामीण भागामुळे हा परिसर नेहमीच अनुकूल राहिला आहे. येथील एक जागा हमखास राखीव असेल. त्यात गावातच डझनभर इच्छुक असल्याने पक्षश्रेष्ठींची उमेदवारी देताना मोठी कसरत होणार आहे.

सध्या सेनेतर्फे विद्यमान नगरसेवक सुदाम डेमसे, बाळकृष्ण शिरसाठ, त्र्यंबक कोंबडे, शारदा दोंदे या पाथर्डीकरांसह रवींद्र गामणे, वसंत पाटील, दीपक केदार, संदेश एकमोडे, करुणा धामणे, चेतन चुंबळे आदी पाथर्डी फाटा भागातून इच्छुक आहेत. दुसरीकडे भाजपतर्फे पाथर्डी गावातील विद्यमान नगरसेवक भगवान दोंदे, माजी नगरसेवक सुदाम कोंबडे, संजय नवले, एकनाथ नवले अशी मोठी यादी आहे, तर शहरी भागातून प्रशांत बडगुजर, संजय गायकवाड, गणेश ठाकूर आदी इच्छुक आहेत. इतर पक्षात राष्ट्रवादीचे सोमनाथ बोराडे, ज्ञानेश्वर महाजन, मनसेचे किरण कोंबडे, मदन डेमसे, पिंपळगाव खांबचे सेनेचे गणेश जाधव, दाढेगाव येथील अंकुश भोर आदींनी उमेदवारीसाठी तयारी केली आहे.

प्रभागातील शहरी भागात मोठ्या संख्येने असणाऱ्या कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा (कसमादे) आणि धुळे, जळगाव, नंदुरबार येथील खानदेशी मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे भाजप आणि सेनेला यंदा या भागातील उमेदवारी देणे आवश्यक आहे, अशी चर्चा आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या वसंत पाटील यांची कन्या सौ. शुक्रवंती यांनी अपक्ष लढत सुमारे तीन हजार मते मिळविली होती. त्यातील बहुतांश मतांचे कसमादे आणि खानदेश कनेक्शन होते, ही बाब दोन्ही प्रमुख पक्षांच्या वरिष्ठांना समजून आल्याने त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतल्याचे समजते. सर्वच उमेदवार पाथर्डी गावातील राहिले, तर मतविभागणी होऊन नक्की कोण निवडून येईल, याची शाश्वती आजतरी कुणीही देऊ शकत नाही.

अर्थात काही प्रमुख उमेदवार पाथर्डी गावचे असले, तरी वास्तव्यास पाथर्डी फाटा भागात असल्याने त्यांचा शहरी भागाशी संपर्क दांडगा आहे. त्याचा फायदा त्यांना नक्कीच आहे. असे असले तरी श्री. डेमसे, नवले, कोंबडे, शिरसाठ, गवळी हे कोणतेही आडनाव आले. तरीही त्यांची गणना पाथर्डी गावातच होते, हेही सत्य आहे. त्यामुळे एकंदरच येथील राजकीय वातावरण कोणत्या अंगाने जाईल, हे बघणे पुढे रंजक ठरणार आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT