Womens in Shivsena meeting
Womens in Shivsena meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिवसेनेचा संकल्प, एक लाख महिलांना रोजगार देणार!

Sampat Devgire

नाशिक : शिवसेना (Shivsena) महिला आघाडीमार्फत नाशिक महानगरातील (Nashik) एक लाख महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प असून, त्यादृष्टीने धडाडीच्या कार्यकर्त्या व उद्योजक श्रुती नाईक यांनी घेतलेला पुढाकार वाखाणण्याजोगा आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी केले.

शिवसेना महिला आघाडीतर्फे शिवबंधन कार्यक्रमांतर्गत पाथर्डी फाटा येथील गुलमोहोर सोसायटीतीत १२५ महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. त्याच्या साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी, पश्चिम विधानसभा संपर्कप्रमुख नीलेश चव्हाण, त्र्यंबक कोंबडे, महिला आघडीच्या समन्वय संघटक शामलाताई दीक्षित, तनुजा घोलप, कीर्ती जवखेडकर, अनिता पाटील, शरदा दोंदे, निलोफर शेख, अंजुम खान आदी उपस्थित होते.

कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली, तर अनेकांचे रोजगारही गेले. अनेकांवर उपासमारीची वेळही आली. या सर्व लोकांना त्यांच्या पायावर उभे करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र, शिवसेनेच्या महिला आघाडीने हे आव्हान स्वीकारले असून, मुंबईच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात शिरकाव करून इकोफ्रेंडली बॅग बनविण्याची मोठी ऑर्डर मिळविली आहे आणि ते काम सुरू झाले आहे. सुरवातीला १२५ महिला त्याचा लाभ घेत असून, हळूहळू त्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार करून महानगरातील एक लाख महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे श्री. बडगुजर म्हणाले.

दत्ता गायकवाड यांनी महिला आघाडीच्या या उपक्रमाचे स्वागत करून समाजाची बांधिलकी जोपासण्यास या कामासाठी व्यावसायिक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे नमूद केले. माजी महापौर विनायक पांडे यांनी मार्केटिंगचे जाळे मोठ्या प्रमाणात विणण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शिवसेना महिला आघाडीने मुंबईच्या धर्तीवर नाशिकमध्येही मोठी बाजारपेठ उभारण्याचे आणि जास्तीत जास्त महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे विशाल स्वप्न बघावे, असे आवाहनही त्यांनी केले.

श्रुती नाईक यांनी प्रास्ताविक केले. चायना मार्केट बंद असल्याने आपणास इकोफ्रेंडली बॅग बनविण्याची बल्क ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. सध्या १२५ महिलांना बॅग बनविण्याचे साहित्य पुरविण्यात आले आहे. घर बसल्या त्या हे काम करू शकता. त्यांना माल आम्हीच पोहोचवतो आणि त्यांनी बनविलेल्या बॅग आम्हीच घेऊन जातो. या महिलांना दररोज सरासरी २५० ते हजार रुपये मोबदला मिळतो, असे श्रुती नाईक यांनी स्पष्ट केले. कार्यक्रम यशस्विसेसाठी संध्या धुमाळ, योगिता गायकवाड, भारती पाईकराव, विजया अहिरे, आशा पाटील आदींनी सहकार्य केले. शिवबंधनासोबतच हळदीकुंकूचा कार्यक्रमही झाला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT