Nashik News: शिवसेनेचे (ठाकरे गट) उपनेते डॉ. अद्वय हिरे यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) नेते, पालकमंत्री दादा भुसे यांना थेट आव्हान देत मतदारसंघातील प्रत्येक गाव पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या दौऱ्याला गावोगावी मोठी गर्दी होत असल्याने भुसे समर्थक अस्वस्थ झाले आहेत.
मालेगाव बाह्य या मतदारसंघात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्यापासून या कुटुंबाचे वर्चस्व आहे. सध्या शिवसेनेचे उपनेते हिरे यांच्या निमित्ताने त्यांची चौथी पिढी राजकारणात आहे. या मतदारसंघात राजकीय पक्ष दुय्यम आणि हिरे तसेच भुसे या दोन गटांत विभागलेले राजकारण अधिक प्रभावी ठरते. सर्व नेते, कार्यकर्ते त्यातच विभागले जातात. सध्या हे चित्र अतिशय वेग घेत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे केंद्र व राज्य सरकारच्या खोटारडेपणाची पोलखोल करण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ हे अभियान दादा भुसे यांच्या मतदारसंघात अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. विविध महत्त्वाची गावे पिंजून काढली जात आहेत. या कार्यक्रमाला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भुसे विरुद्ध हिरे राजकारण तापले आहे.
मालेगाव शहर मुस्लिमबहुल असून, मध्य मतदारसंघात शिवसेनेतर्फे ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रम होत आहेत. त्यात अद्वय हिरे यांनी नुकतेच नागरिकांच्या सोयीसाठी शिवसेना नागरी सुविधा केंद्र व मालेगाव-मध्य संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले.
केद्र व राज्य सरकारकडून सामान्य माणसाची चेष्टा सुरू असून, बोलघेवड्या योजना, खोट्या आश्वासनांशिवाय जनतेसाठी भक्कम असे काहीही केले नाही.
बेरोजगारी, आरोग्य सुविधांची वानवा, विकासाच्या नावाने सुरू असलेला भ्रष्टाचार, कंत्राटी भरती, गोरगरिबांच्या हक्काच्या शाळांचे खासगीकरण यांसारख्या अनंत अडचणींमध्ये सामान्य माणसाला अडकवून विकासाच्या बाता मारणाऱ्या या सरकारकडून सामान्य मतदाराला काहीएक अपेक्षा उरली नसून, बदलाचे वारे वाहू लागल्याने या सरकारचे धाबे दणाणले आहेत.
पराभव समोर दिसत असल्याने निवडणुकाही दूर ढकलण्याचा प्रयत्न सुरूर आहे. मात्र, सामान्य मतदार या वेळी परिवर्तनाची, विकासाची कास धरत उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळातील सुखसुविधा व नागरीहिताच्या निर्णयांचे कौतुक करत असल्याचे हिरे यांनी या वेळी सांगितले.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.