Dhule city Garbage collection
Dhule city Garbage collection Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

अरेरे... माजी उपमहापौर, सभापतींना उचलावा लागतोय कचरा!

Sampat Devgire

धुळे : शहरातील कचरा संकलनप्रश्‍नी विरोधकांसह सत्ताधारी पदाधिकारी, नगरसेवकांनी आदळआपट करून, स्थायी समितीने मागच्या सभेत निर्णय घेऊनदेखील याप्रश्‍नी काहीही सुधारणा झालेली नसल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले. सत्ताधारी भाजपचे विद्यमान नगरसेवक तथा माजी उपमहापौर व माजी स्थायी समिती सभापती यांना आपल्या प्रभागात स्वतःच कचरा उचलण्याची, संकलन करण्याची वेळ आली. या दोन्ही माजी पदाधिकाऱ्यांनी याप्रश्‍नी प्रशासनाचा धिक्कार केला. ही परिस्थिती पाहता शहरात इतरत्र काय स्थिती असेल हे वेगळे सांगायला नको.

शहरातील प्रभाग १४ च्या नगरसेविका तथा माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, तसेच स्थायी समितीचे माजी सभापती युवराज पाटील हेदेखील प्रभागातील कचऱ्याचा प्रश्‍न मांडत आहेत. प्रभागात घंटागाड्या, ट्रॅक्टर येत नाहीत. त्यामुळे प्रभागात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. प्रभागाला डंपिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाल्याचा आरोप करत श्रीमती अंपळकर व श्री. पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या. आयुक्तांकडे गाऱ्हाणे मांडले, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर या दोन्ही माजी पदाधिकारी तथा विद्यमान नगरसेवकांनी गुरुवारी काही नागरिकांना सोबत घेत प्रभागात कचरा संकलन, कचरा उचलण्याची मोहीम सुरू केली.

दसरा सण अवघ्या २४ तासांवर येऊन ठेपलेला असताना स्वच्छतेच्या बाबतीत ठणठणाट असल्याने आम्ही स्वतःच प्रभागात साफसफाईसाठी आलो आहोत. नवरात्रीचे उपवास असतानाही प्रभागातील महिला आमच्यासोबत साफसफाईसाठी आल्या आहेत, असे श्रीमती अंपळकर व श्री. पाटील यांनी सांगितले. काहीही उपाययोजना न करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा त्यांनी तीव्र शब्दांत धिक्कारही केला. कचऱ्यामुळे साथरोगांनी डोके वर काढलेले असताना महापालिका प्रशासन ढिम्म आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत कचरा संकलनाचे काम सुरळीत झाले नाही तर रास्ता रोको आंदोलन करू, असा इशाराही श्रीमती अंपळकर व श्री. पाटील यांनी दिला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT