Shrirampur municipal election : श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता थांबली असली, तरी निकालापूर्वी शहरात काही ‘अजब गजब’ किस्से चांगलेच चर्चेत आले आहेत.
मतदान आटोपले, निकाल 21 डिसेंबरला लागणार, त्यामुळे उमेदवारांना मिळालेला वेळ आता आकडेमोड आणि देव-धर्म करण्यावर सत्कारणी लावल्याचे दिसत आहे. पण या सगळ्या गोंधळात, काही उमेदवारांना भविष्याचा वेध घेण्यासाठी आलेल्या जटाधारी साधूंनी भल्याभल्यांना चुना लावल्याची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे.
निवडणुकीदरम्यान, एका चारचाकी वाहनातून आलेल्या ‘जटाधारी साधूंच्या’ टोळीने श्रीरामपूर (Shrirampur) शहरात चांगलीच धूम मचवली. हे साधू आपण उज्जैन महाकालेश्वर इथून आल्याचं सांगत होते. त्यांचा पेहराव, पूर्ण अंगाला भस्म, वाढलेल्या जटा यामुळे पाहणाऱ्यांची सहजच दिशाभूल होत असे.
या साधूंनी निवडणुकीतील (Election) नगरसेवक पदाचे उमेदवार हेरले. त्यांना गाठून, त्यांच्या विजयाची अचूक आकडेमोड आणि गणिते मांडून दाखवायचे. उमेदवार त्यांच्या बोलण्यात आला की, मग पुढील डावपेच सुरू. गाडीतून दोघे खाली उतरायचे आणि गाडीत बसलेला एक साधू आपल्याकडील रुद्राक्ष काढून उमेदवाराला देत असे.
अखेरीस, आपला विजय नक्की होणार या जोशात आलेला उमेदवार सहज खिशात हात घालून किमान पाच हजार ते जास्तीत जास्त अकरा हजार रुपयांची देणगी देऊन त्या साधूंचे दर्शन घेऊन त्यांना 'वाटी' लावत असे. शहरातील किमान 25 ते 30 सदस्य यांच्या बोलण्यात आल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
काही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार देखील त्यांच्या नादी लागल्याची चर्चा असली, तरी त्याला अद्याप पुष्टी मिळालेली नाही. गंमत म्हणजे, आदल्या दिवशी कोणत्या प्रभागातील उमेदवाराकडे जायचे, याची माहिती हे साधू आधीच गोळा करत होते. म्हणजे, हा भविष्याचा वेध होता की निवडणुकीपूर्वीची गृहपाठ? याची चर्चा आता हळूच होत आहे.
दुसरीकडे, मतदान आटोपले आहे, पण 'ईव्हीएम'मध्ये बंदिस्त झालेले भविष्य काय असेल, याचा अंदाज कोणालाही लागत नाहीये. त्यामुळे आकडेमोड आणि चर्चांना तात्पुरता फाटा देत, अनेक उमेदवार सध्या 'धार्मिक पर्यटनाला' पसंती देत आहेत. अनेक नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्या कुलदैवताला साकडे घालण्यासाठी बाहेर पडले आहेत. यामध्ये सर्वाधिक पसंती मिळाली आहे ती तुळजापूरच्या भवानी देवीला. त्यानंतर धार्मिक पर्यटन म्हणून काही लोकांनी थेट खाटू श्यामकडे धाव घेतल्याचे समजते.
थोडक्यात, निवडणुकीच्या धामधुमीत ‘साधूबाबां’ना देणगी देऊन अनेकांनी आपले भविष्य ‘पॅकेज’ केले. आता 'ईव्हीएम'मधील भविष्याची चिंता घेऊन अनेक जण कुलदैवताच्या चरणी हजेरी लावत आहेत. 21 डिसेंबरला निकाल लागेल, तेव्हा कळेल की साधूबाबांचे ठोकताळे खरे ठरले की कुलदैवताचा आशीर्वाद!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.