Mahayuti MVA split in Ahilyanagar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mahayuti MVA split in Ahilyanagar : नगराध्यक्षपदाचे मैदान 'खुले'; इच्छुकांच्या गर्दीमुळे महायुती व 'मविआ'ला सुरूंग!

Shrirampur Nagarparishad Mayor Seat Open Mahayuti–MVA Rift in Ahilyanagar :श्रीरामपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद यावेळी सर्वसाधारण खुले झाल्याने अनेक जुन्या-जाणत्या, तसेच नव इच्छुकांच्या राजकीय, आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Pradeep Pendhare

Ahilyanagar politics Mahayuti vs MVA : गेल्या चार वर्षांपासून पालिका निवडणुकीची वाट पाहणाऱ्या पुढाऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. यापूर्वी ओबीसी महिलांसाठी राखीव असलेले श्रीरामपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद यावेळी सर्वसाधारण खुले झाल्याने अनेक जुन्या-जाणत्या, तसेच नव इच्छुकांच्या राजकीय, आशा पल्लवीत झाल्या आहेत.

पारंपरिक लढतींसोबतच आता नवीन चेहऱ्यांनीही नगराध्यक्षपदाचे डोहाळे लागले आहेत. सर्वच पक्षातून इच्छुक समोर येत असल्याने आगामी निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीची शक्यता श्रीरामपुरात धूसर झाल्याचे चित्र आहे.

श्रीरामपुरात घडले मग राज्यात

गेल्या चार वर्षांपासून नगरपरिषदेवर प्रशासकराज सुरू होते. न्यायालयाच्या आदेशानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मार्ग मोकळा झाला आहे. सन 2016 मध्ये माजी आमदार (कै.) जयंत ससाणे यांची सुमारे 30 वर्षांची नगरपरिषदेवरील एकहाती सत्ता उलथवून लावण्यासाठी विरोधकांनी मोट बांधली होती. राजश्री ससाणे यांच्या विरोधात माजी मंत्री खासदार (कै.) गोविंदराव आदिक यांच्या कन्या अनुराधा आदिक यांना निवडणूक रिंगणात उतरवून श्रीरामपूरकरांनी त्यांच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ घातली. यानंतर ससाणे संघटना फुटली आणि अंजूम शेख यांनी 12 नगरसेवकांसह स्वतंत्र गट स्थापन केला. ज्या सत्ता संघर्षाला श्रीरामपूरने (Shrirampur) मार्ग दाखविला, तोच राजकीय डावपेच नंतर राज्यातही दिसून आला.

​ससाणे गटाला सत्तेचे 'डोहाळे'

जवळपास नऊ वर्षे (पाच वर्षे विरोध आणि चार वर्षे प्रशासक काळ) सत्तेतून बाहेर असलेल्या ससाणे गटाला आता सत्तेचे डोहाळे लागले आहेत. मात्र, 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसचे (Congress) लहू कानडे यांच्याविरोधात जात हेमंत ओगले यांना काँग्रेसकडून तिकीट मिळवून देण्यात करण ससाणे यशस्वी झाले.

विखे पाटलांशी थेट राजकीय वैर

राज्यात महायुतीची सत्ता आल्याने बेचैन झालेल्या ससाणे गटातील कट्टर समर्थकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे, करण ससाणे यांनी वडिलांचे कट्टर विरोधक माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्याशी हातमिळवणी करून राजकारणाची चुणूक दाखवली. बाजार समितीत विखे, मुरकुटे व ससाणे युतीची सत्ता आली. मात्र, ससाणे यांनी सभापतीपदासाठी मुरकुटे यांच्या साथीने त्यांनी विखे पाटलांशी थेट राजकीय वैर घेतले.

दावेदारांमध्ये घराणेशाही

नुकत्याच जाहीर झालेल्या प्रभाग रचनेनुसार दोन नगरसेवक वाढले असून, नगराध्यक्ष पद सर्वसाधारण खुले झाल्याने अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. अजित पवार यांच्या ​राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक या प्रमुख दावेदार असतील. माजी आमदार लहू कानडे यांचे बंधू अशोक कानडे हेही राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. अनुराधा आदिक यांच्या विरोधात काँग्रेसकडून राजश्री ससाणे यांना निवडणूक रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे.

प्रमुख धुरंधर मैदानात

तसेच, करण ससाणे हे देखील पुरुष उमेदवार रिंगणात आल्यास नशीब आजमावू शकतात. माजी नगराध्यक्ष संजय फंड व माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणे हे भाजपकडून इच्छुक आहेत. भाजप पक्षातून निष्कासित झालेले प्रकाश चित्ते यांनी 'समर्पित भाजप'च्या नावाने थेट विखे पाटील यांच्या अंगावर जाण्याची तयारी ठेवत आरपारची लढाई लढण्याची कंबर कसली आहे. ​

मुस्लिम मतांवर बेरजेचं राजकारण

माजी आमदार मुरकुटे यांच्या सून मंजुश्री, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दावा दाखल करू शकतात. विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविलेले शिवसेनेत गेलेले राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक अध्यक्ष सागर बेग यांनी नगराध्यक्ष पदाच्या आखाड्यात धक्का देण्याची तयारी ठेवली आहे. अंजूम शेख यांच्यासारखा मुस्लिम चेहराही मुस्लिम मतांच्या एकगठ्ठा मतदानावर चितपट करण्यासाठी रिंगणात उतरल्यास आश्चर्य वाटायला नको.

समाज माध्यमांवर प्रमोशन सुरू

​एका बाजूला नगराध्यक्ष पद सर्वसाधारण खुले झाल्याने उत्साहाचे वातावरण असून, नगराध्यक्ष पदासाठी चढाओढू लागेल हे मात्र निश्चित आहे. आरक्षण सोडतीत सर्वसाधारण खुले पद निघाल्याने चौकाचौकात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. अनुराधा आदिक आणि करण ससाणे यांच्या समर्थकांनी डोलीबाजा लावत जल्लोष केला. सोशल मीडियावर 'कहो दिलसे अनुराधाताई फिरसे', 'चित्ते यांनी जनतेचा मनातील नगराध्यक्ष म्हणून प्रमोशन सुरू केले', तसेच ससाणे समर्थकांकडून 'आठ वर्षांचा संघर्ष संपला म्हणत चला पुन्हा आपलं स्वाभिमानी श्रीरामपूर घडवुया' अशा पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT