Rajabhau Waje & Manikrao Kokate
Rajabhau Waje & Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate news; सिन्नरच्या निवडणुकांत कोकाटे समर्थक जोमात?

Sampat Devgire

सिन्नर : तालुक्यातील (Sinner) बारा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे वातावरण अंतिम टप्प्यात तापले असून, मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत नेत्यांनी थेट भाग घेतला नाही. मात्र आपल्या समर्थकांना छुपी रसद पुरवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि शिवसेना (Shivsena) नेते राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांची राजकीय दिशा ठरेल. (Manikrao Kokate & Rajabhau Waje`s supporters prestige involve in Village panchayat election)

तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचे व प्रभावी असलेले ठाणगाव, नांदुरशिंगोटे यांसह महत्त्वाच्या गावांचा त्यात समावेष आहे. त्यातून आगामी राजकारणाची दिशा ठरेल. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या समर्थकांचे या गावांत वर्चस्व वाढणार की कमी होणार हे निकालांतून स्पष्ट होईल.

जवळपास २८५ कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस बंदोबस्तही देण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. येथील तहसील कार्यालयात उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ईव्हीएम मशिन सेटिंग व सील करण्यात आले.

४८ मतदान केंद्र तयार केली असून, त्यावर १२ सरपंच व ८८ सदस्य निवडीसाठी मतदान होणार आहे. ४८ मतदान केंद्रांवर प्रत्येकी पाच कर्मचारी, तसेच ९ राखीव टीम तयार करण्यात आले आहे. याप्रमाणे २४० कर्मचारी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर तर ४५ कर्मचारी राखीव राहणार आहे. मतदान केंद्रनिहाय पोलिस देखील राहणार आहेत. येथील तहसील कार्यालयात बुधवारी अकराला सरपंच व सदस्य पदाचे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व नायब तहसीलदार सागर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान यंत्र बंद (सील) करण्यात आले.

सर्व मतदान केंद्रांची पाहणी करण्यात आली असून, त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. मतदानासह एकूणच प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू दिला जाणार नाही. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार एकनाथ बंगाळे, नायब तहसीलदार सागर मुंदडा यांनी केले आहे.

या ग्रामपंचायतींची निवडणूक

तालुक्यातील ठाणगावसह शहा, नांदूरशिंगोटे, टेंभुरवाडी, सायाळे, उज्जनी, कारवाडी, पाटपिंप्री, कीर्तांगळी, वडगाव पिंगळा, लोणारवाडी, डुबेरेवाडी या बारा ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान होत आहे. कार्यकर्त्यांनी डिजिटल प्रचारावर भर दिल्याचे दिसून येत आहे.

अंतिम टप्प्यात वातावरण तापले

तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामीण भागात राजकीय रणधुमाळी सुरु असून शेवटच्या टप्प्यात प्रचारात रंगत वाढली आहे. ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेण्यासाठी सत्ताधारी-विरोधकांसह नवतरुणांनी कंबर कसली आहे. सरपंचपदाच्या १२ जागांसाठी ४० उमेदवार निवडणूक रिंगणात असून ११२ सदस्यांपैकी २४ सदस्य बिनविरोध झाल्याने ८८ सदस्यांकरिता मतदान होणार आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या १८ डिसेंबरला होणार असून निवडणूक विभागाने त्यादृष्टीने तयारी सुरु केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT