Jalgaon Collector Rohan GhugeTakes Initiative for Farmer Children Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Snehwan : वडील दगावलेल्या शेतकरी मुलांसाठी स्नेहवन धावले, जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी टाकलं पहिलं पाऊल

Jalgaon Collector Rohan Ghuge Takes Initiative for Farmer Children : निराशेच्या गर्तेत जाऊन आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतलेल्या मुलांसाठी स्नेहवन धावून आलं अन् त्याच स्नेहवनला आता जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हात दिला आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon News : वाढते जागतिक तापमान, दुष्काळ, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्ती आणि बदलते हवामान यामुळे शेतकऱ्यांचे जीवन अत्यंत कठीण बनत चालले आहे. दीर्घकाळ आशेवर जगणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना अखेर निराशेच्या गर्तेत जावे लागते आणि अन्न, आरोग्य व पोषण देणाऱ्या या अन्नदात्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे.

मात्र, ही कहाणी फक्त आत्महत्येपर्यंतच मर्यादित राहते का? त्या शेतकऱ्यांच्या मागे उरलेल्या कुटुंबांचे आणि मुलांचे काय? आशा, आधार आणि उज्ज्वल भविष्यासाठीची स्वप्ने हरवलेल्या या मुलांना अंधारात संघर्ष करत जीवन जगावे लागते.

या मुलांना प्रेम, काळजी आणि सुरक्षितता मिळू नये का? त्यांना चांगले शिक्षण आणि सामान्य आयुष्य जगण्याचा अधिकार नाही का? स्नेहवनचा ठाम विश्वास आहे की, प्रत्येक मुलाप्रमाणेच या मुलांनाही सर्व संधी आणि हक्क मिळायला हवेत.

स्नेहवन ही डिसेंबर 2015 मध्ये अशोक देशमाने यांनी स्थापन केलेली एक स्वयंसेवी संस्था आहे. पुणे जिल्ह्यातील आळंदी परिसरात कार्यरत असलेल्या या संस्थेचे उद्दिष्ट म्हणजे शेतकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलांसाठी प्रेमळ, सुरक्षित आणि सर्वसमावेशक शैक्षणिक वातावरण निर्माण करणे.

प्रतिकूल परिस्थिती आणि वातावरणामुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांसाठी स्नेहवन एक चळवळ म्हणून कार्य करत आहे. स्नेहवन सांगते, आमचा विश्वास आहे की, शिक्षण हे जीवनाला दिशा देणारे वरदान आहे आणि वंचित मुलांचे आयुष्य कायमचे बदलण्याचा तोच एक प्रभावी मार्ग आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शालेय शिक्षणासोबतच स्नेहवन या मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन व तयारी करून देतो. योग्य मार्गावर चालत त्यांना त्यांच्या हक्क आणि जबाबदाऱ्यांची जाणीव व्हावी, संधी शोधता याव्यात, अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ मिळावे आणि नेतृत्वगुण विकसित व्हावेत यासाठी स्नेहवन प्रयत्नशील आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी धावलेल्या स्नेहवन सोबत जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही एक पाऊल टाकलं आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पुढाकार घेतला आहे. स्नेहवन या संस्थेमार्फत त्यांनी 'आपुलकी' हा नवा उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमांतर्गत पुणे येथील ‘स्नेहवन’ ही सामाजिक संस्था शेतकरी आत्महत्या केलेल्या व्यक्तींच्या पाल्यांना मोफत शिक्षण व निवासाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. आळंदी येथील निवासी शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. ‘स्नेहवन’ ही सामाजिक संस्था २०१५ पासून मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. संस्थेविषयी अधिक माहिती www.snehwan.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पात्रता निकष असे

- विद्यार्थी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असावा.

- प्रवेश इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असेल.

- इच्छुक व पात्र कुटुंबांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा

- जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२२३१८० / ०२५७-२२१७१९३ वर संपर्क साधावा.

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त ज्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी आपल्या पात्र मुलांची नोंदणी १५ मेपर्यंत करून घ्यावी. जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमास पात्र लाभार्थ्यांनी प्रतिसाद देऊन या संधीचा लाभ घ्यावा.
- रोहन घुगे, जिल्हाधिकारी जळगाव

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी प्रशासनाच्या वतीने जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी टाकलेलं हे पहिलं पाऊल म्हणता येईल. खरे तर यातून प्रेरणा घेऊन इतरजणही पुढे येतील अशी आशा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT