Sonia Gandhi Belonging memoir : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र ‘बिलाँगिंग’ पुस्तकात अहिल्यानगरमधील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे दिल्लीतील आंदोलनावर भाष्य केले आहे. या आंदोलनानंतर अण्णा हजारेंविषयी पुन्हा काहीही ऐकू आले नाही किंवा त्यांच्याबद्दल लिहिले गेले आहे, असे सोनिया गांधी यांनी लिहिले आहे.
यावर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. 'ज्या रंगाचा चष्मा, त्या रंगाचेच जग दिसते, त्यांचा चष्माच त्या रंगाचा असेल तर त्यांना वेगळे काय दिसणार?,' असा टोला अण्णांनी सोनियांचे नाव न घेता या लिखाणावर लगावला आहे.
अण्णा हजारे (Anna Hazare) म्हणाले, "ज्या रंगाचा चष्मा, त्या रंगाचेच जग दिसते; त्यांचा चष्माच त्या रंगाचा असेल, तर त्यांना वेगळे काय दिसणार? कोण काय म्हणतो यापेक्षा समाज काय म्हणतो हे महत्त्वाचे! मी कधीही कोणत्याही पक्षाच्या किंवा पार्टीच्या जवळ गेलो नाही, मी फक्त समाज आणि देश पाहिला. कोण निंदा करतो किंवा वंदन करतो, याकडे लक्ष न देता आपण आपले काम करत राहिले पाहिजे. कोण काय बोलते यापेक्षा समाज आपल्याकडे काय म्हणून पाहतो हे महत्त्वाचे!"
देशात तत्कालीन युपीए सरकारविरोधात दिल्लीत 2012मध्ये अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' या नावाने चळवळ सुरू झाली होती. या चळवळीला प्रसार माध्यमांनी व्यापक अशी प्रसिद्धी दिली होती. अण्णांच्या या आंदोलनाला गुप्तपणे भाजप आणि आरएसएसचे (RSS) पाठबळ होते, हे नंतर पुढे चळवळीतील काही सहभागींनी म्हटले. लोकपाल विधेयकासाठी अण्णा आंदोलनावर ठाम होते. भाजपच्या आक्रमक प्रचारासमोर सरकारला बचावात्मक भूमिकेत यावे लागले, असे सोनिया गांधी यांनी म्हटले.
भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून, अण्णा हजारेंनी इंडिया अगेन्स्ट करप्शन चळवळीद्वारे लोकपाल विधयेकाची मागणी केली होती. त्यानुसार 2014मध्ये युपीए सरकारने लोकपाल विधेयक आणले. यानंतर देशात भाजपचे सरकार आले. आता हेच विधेयक भाजपच्या काळात विस्मृतीत गेले आहे. सरकार उलथवून टाकण्याचे खरे उद्दिष्ट विरोधकांनी साध्य केले. नंतर अण्णा हजारे यांच्याबद्दल पुन्हा काहीही ऐकू आले नाही किंवा त्यांच्याबद्दल लिहिले गेले नाही, असेही सोनिया गांधी यांनी पुस्तकात लिहिले आहे.
सोनिया यांनी पुस्तकात अण्णांच्या आंदोलनाच्या वर्षाचा उल्लेख 2012 केला आहे. परंतु हे आंदोलन 2011वर्षापासून सुरू झाले आहे. याचवेळी अण्णांच्या आंदोलनाने जेव्हा जोर पकडला होता, त्याचवेळी आरएसएस नवीन पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची तयारी करत होते, असेही गांधी यांनी लिहिले आहे. पुस्तकात अण्णांच्या आंदोलनाचा उल्लेख, भाजप आणि आरएसएसचे बळाचा संदर्भ आल्याने, त्यावर आगामी काळात अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.