Sameer Bhujbal & Suhas Kande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sameer Bhujbal : समीर भुजबळ यांचे बंड; सुहास कांदे यांची निवडणूक झाली अवघड?

Nandgaon Assembly Constituency: नांदगाव मतदारसंघात आज समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारीची घोषणा करीत आमदार कांदे यांची निवडणूक अवघड करीत राजकारणाला नवे वळण दिले.

Sampat Devgire

Nashik News: नांदगाव मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांची आज झोप उडाली. अती आत्मविश्वासात असलेल्या आमदार कांदे यांना आता आव्हान निर्माण झाले आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांची उमेदवारी हे महायुतीत बंड आहे.

गेल्या आठवड्याभरात आमदार कांदे यांनी सत्ताधारी असल्याचा पुरेपूर लाभ घेत विरोधकांची कोंडी केली होती. विशेषतः महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश धात्रक यांच्या विरोधात त्यांची व्यूहरचना होती. मराठा समाजाने पुरस्कृत केलेल्या डॉ रोहन बोरसे यांना प्रशासकीय जंजाळात अडकवण्यात ते यशस्वी झाले होते. आज त्यांना प्रबळ उत्तर मिळाल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुंबई शहर अध्यक्ष आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी अपेक्षेप्रमाणे आज नांदगाव मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी खासदार भुजबळ यांच्या उमेदवारीने या मतदारसंघातील सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता चुरशीची झाली आहे.

आमदार कांदे गेले सहा महिने मतदारसंघात विविध आर्थिक, प्रशासकीय आणि राजकीय प्रयोग करीत होते. त्यांना आव्हान देईल असा प्रबळ उमेदवार कोण? याबाबत मतदारांत चर्चा होती. माजी खासदार भुजबळ यांच्या उमेदवारीने त्याला उत्तर मिळाले आहे.

आमदार कांदे यांनी गेली पाच वर्ष केलेला कारभार हा लोकशाही विरोधी आणि व्यवस्थेला गुंडाळणारा होता. या कालावधीत अनेक गैरप्रकार झाले आहेत. मतदारसंघात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. सामान्य मतदारांत असुरक्षिततेची भावना होती. मतदारसंघातून सातत्याने झालेल्या मागणीने आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, असे माजी खासदार भुजबळ यांनी सांगितले.

नांदगाव मतदारसंघात यंदा शेवटच्या टप्प्यात निवडणूक अतिशय रंगतदार होईल असे चित्र निर्माण झाले आहे. या मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार कांदे यांनी पक्षात बंड झाल्यावर एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता.

आमदार कांदे यांच्या विरोधात आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून गणेश धात्रक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या दोन आठवड्यात डॉ रोहन बोरसे यांना मराठा महासंघातर्फे उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आली.

मराठा समाजातर्फे अन्य समाजांना बरोबर घेऊन या निवडणुकीत सामाजिक प्रयोग करण्यासाठी डॉ बोरसे यांची उमेदवारी असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे आता येथे चौरंगी लढत होईल अशी स्थिती आहे.

यामध्ये आमदार कांदे यांना सर्वार्थाने आव्हान देण्याची क्षमता माजी खासदार भुजबळ यांच्यात आहे. याशिवाय महाविकास आघाडीचे धात्रक हे कांदेविरोधकांचे उमेदवार आहेत. या सर्व मत विभागणीत डॉ रोहन बोरसे हे निर्णायक भूमिका बजावू शकतात.

डॉ बोरसे यांची शासकीय स्तरावर कोंडी करण्याचा पूर्ण प्रयत्न राजकीय स्तरावर करण्यात आला. डॉ बोरसे हे वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यास प्रशासनाने विलंब केला होता. त्याविरुद्ध आंदोलन झाल्याने स्थानिक स्तरावर हा राजीनामा मंजूर झाला आहे. मात्र मंत्रालयीन स्तरावर त्याला मंजुरी मिळाली अथवा नाही हे अद्याप स्पष्ट नाही.

यावर तातडीने पावले टाकून डॉ बोरसे यांच्या वतीने आज सकाळी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची त्यांची मागणी आहे. मात्र अद्यापही बोरसे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला की नाही हे अस्पष्ट आहे.

मतदारसंघात यापूर्वी दोन टर्म पंकज भुजबळ हे आमदार होते. गेल्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार कांदे यांनी त्यांचा पराभव केला होता. गेली पाच वर्ष या मतदारसंघात आणि जिल्ह्यात देखील आमदार कांदे यांनी सातत्याने मंत्री भुजबळ यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

आमदार कांदे यांनी मंत्री भुजबळ यांच्यावर विविध आरोप देखील केले होते. या पार्श्वभूमीवर भुजबळ आणि कांदे यांच्यातील राजकीय वैर टोकाला गेले होते. त्यातून माजी खासदार भुजबळ यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे नांदगाव मतदारसंघाची निवडणूक आणि राजकारण येत्या काही दिवसात अधिक रंजक होईल, अशी स्थिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT