Sunetra Pawar Gungi Gudiya Row : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसकडून करण्यात आलेल्या 'गुंगी गुडिया' या उल्लेखावरून राज्यातील राजकारण अधिक तापले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भूमिकेवर आमदार संग्राम जगताप यांनी जोरदार पलटवार करत, "सोनिया गांधींबाबत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली वक्तव्ये आठवा," असा टोला लगावला. तसेच, "सुनेत्रा पवार यांचे काम लवकरच 'माँ दुर्गे'च्या रूपात दिसेल," असा दावाही त्यांनी केला.
सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या वक्तव्याचा निषेध करत संग्राम जगताप (Sangram Jagtap) म्हणाले की, काँग्रेस नेतृत्वाने महिलांविषयी वापरलेली भाषा ही त्यांच्या राजकीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी आहे. "ज्यांचे नेतृत्व सोनिया गांधी करतात, त्यांचा जन्म भारतात झालेला नाही. तरीही त्यांच्यावर अशा पद्धतीने टीका करण्यात आली नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्याबाबत जे मत व्यक्त केले होते, तेच योग्य होते," असे विधान त्यांनी केले.
जगताप यांनी पुढे सांगितले की, "जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या परंपरेतील महिला नेतृत्व म्हणून सुनेत्रा पवार महाराष्ट्रात (Maharashtra) काम करत आहेत. पवार कुटुंब हे राज्यातील प्रमुख राजकीय कुटुंबांपैकी एक आहे. त्या कुटुंबातील महिलेबाबत अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नाही. सुनेत्रा पवार यांचे काम लवकरच 'माँ दुर्गे'च्या रूपात दिसेल. मात्र त्याआधी त्यांचे समर्थक शांत बसणार नाहीत," असा इशाराही त्यांनी दिला.
दोन दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार अहिल्यानगर दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानीही भेट दिली. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यानंतर जगताप यांच्या घरी भेट देणाऱ्या त्या पवार कुटुंबातील आणखी एक प्रमुख नेत्या ठरल्या.
'गुंगी गुडिया' वादानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसविरोधात राज्यभर आक्रमक भूमिका घेतली आहे. काही ठिकाणी काँग्रेस कार्यालयांबाहेर आंदोलन, फलकांवर शाईफेक आणि निषेधाच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.
या वादानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, "इंदिरा गांधी यांनाही एकेकाळी 'गुंगी गुडिया' म्हटले गेले होते. मात्र त्यांनी आपल्या कर्तृत्वातून ते खोटे ठरवले. सुनेत्रा पवार यांनीही तसेच काम करून दाखवावे."
त्यांनी पुढे सुनेत्रा पवार यांना काही राजकीय आव्हानेही दिली. "जर त्या खऱ्या अर्थाने सक्षम नेतृत्व सिद्ध करू इच्छित असतील, तर त्यांनी अर्थ खाते स्वतःकडे घ्यावे, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपयांच्या आश्वासनाची पूर्तता करावी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द करावा आणि अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याची भूमिका घ्यावी. हे त्यांनी करून दाखवले, तर महाराष्ट्र त्यांना 'दुर्गा' म्हणेल," असे सपकाळ म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.