Shivsena rebel corporators with CM Eknath Shinde
Shivsena rebel corporators with CM Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena News; हकालपट्टीच्या शिक्का टाळण्यासाठी शिंदे गटात प्रवेश

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) शिवसेनेशी (Shivsena) गद्दारी करणाऱ्यांचे श्राद्ध घालू, असा इशारा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्यानंतर शिवसेनेच्या मुखपत्रातून हकालपट्टीचे संकेत मिळाल्याने तेरा नगरसेवकांचा घाईघाईने शिंदे गटात (Eknath Shinde) प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे. हकालपट्टीचा शिक्का माथी लागल्यास या नगरसेवकांना (NMC corporators) आपल्या मागण्या मान्य करून घेताना अडथळे आले असते, ही भीती त्यामागे होती असे बोलले जाते. (Rebel corporators are in a tension of suspension from Shivsena)

जून महिन्यात राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या मदतीने सरकार स्थापन झाले. बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नवीन पक्षाला दमदार नेत्यांची भरभक्कम फळी उभी करायची आहे.

पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे व नांदगावचे आमदार सुहास कांदे वगळता दमदार नेता शिंदे गटात सहभागी झाला नव्हता. त्यामुळे नाशिक शहरात नागरिकांसमोर शिंदे गट म्हणून जाताना प्रभावहिनता अधिक दिसून येत होती. अशा परिस्थितीमध्ये दमदार नेत्यांची आवश्यकता होती. त्याअनुषंगाने माजी नगरसेवकांना शिंदे गटात आणणे आवश्यक होते.

दोन महिन्यांपूर्वीच प्रवेश निश्चित

संघटनात्मक पातळीवर शिवसेने अंतर्गत असलेल्या कुरबुरी व गटबाजीचा फायदा घेत जवळपास १३ माजी नगरसेवकांना शुक्रवारी (ता.१६) मध्यरात्री शिंदे गटात प्रवेश देण्यात आला. शिंदे गटासाठी मोठी उपलब्धी तर शिवसेनेसाठी मोठा झटका मानला जात आहे. यानिमित्ताने नाशिकच्या राजकीय पटलावर नव्या पक्षाची दमदार एन्ट्री झाल्याचे मानले जात आहे.

तेरापैकी सात ते आठ माजी नगरसेवक असे आहेत की, त्यांच्या प्रभागात पक्षापेक्षा व्यक्ती म्हणून मतदान होते. त्यामुळे महापालिकेच्या सभागृहात आजतरी शिंदे गटाचे सात ते आठ नगरसेवक दिसतील, असे बोलले जाते. शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांचा दोन महिन्यांपूर्वीच प्रवेश निश्चित झाला होता, मात्र माध्यमांमध्ये शिवसेना फुटीच्या बातम्या झळाकल्यानंतर दोन पावले मागे जाण्याची भूमिका घेतली गेली.

भविष्यात आणखी प्रवेश?

१८ माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे शिवसेनेत चर्चा होती. यातील १३ जणांनी शुक्रवारी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत प्रवेश केला. येत्या काही काळात आणखी पाच माजी नगरसेवक व पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

बातमी फुटण्याची कुणकूण

शिवसेना सोडून अन्य पक्षात प्रवेश करणाऱ्यांची माहिती वरिष्ठ पातळीवर पोचल्यास शिवसेनेचे मुखपत्र सामनातून हकालपट्टी केली जाते. हकालपट्टीचा शिक्का माथी लागल्यानंतर अन्य पक्षात प्रवेश करताना हकालपट्टी झालेल्यांना अटी व शर्तींमध्ये कपात करावी लागते. नाशिकचा दौरा आटोपून गुरुवारी मुंबईकडे परतताना शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी गद्दारी करणाऱ्यांचे श्राद्ध घालू असा इशारा दिला होता. त्यामुळे सामनात हकालपट्टीचे वृत्त प्रसिद्ध होण्याची कुणकूण लागल्यानेच घाईघाईने गुरुवारी स्वतंत्र सवतासुभा उभारणाऱ्या माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT