Sugarcane Andolan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sugarcane Andolan: ऊसदर आंदोलनाची तीव्रता वाढणार ? शेतकरी नेते अन् कारखानदारांमधील बैठक निष्फळ

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News: शेवगाव तहसील कार्यालयामध्ये मंगळवारी पाथर्डीचे प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी नेते व साखर कारखानदार यांच्यातील ऊसदराची बैठक वादळी झाली. मात्र, बैठकीमध्ये ऊसदराबाबत कोणताही निर्णय झाला नाही.

या वेळी बैठक संपल्यानंतर शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी साखर कारखानदारांचा जाहीर निषेध व्यक्त करत मोठी घोषणाबाजी केली. कारखानदार संगनमत करून कमी भाव ठरवत असल्याचा आरोप या वेळी विविध संघटनांच्या शेतकरी नेत्यांनी केला.

शेवगाव तालुका शेतकरी संघटनेकडून गेल्या दोन महिन्यांपासून ऊसदराबाबत विविध मागण्यांचे निवेदन साखर प्रशासन व शेवगाव तहसीलदार यांना देण्यात आली होती. वेळोवेळी यावर शेवगाव तहसीलदार यांनी बैठकाही आयोजित केल्या.

शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात मागील गळीत हंगामातील 300 रुपये व चालू वर्षीच्या गळीत हंगामात उसाला प्रतिटन 3100 रुपये पहिला हप्ता मिळावा, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेले दोन महिने प्रशासन व साखर कारखानदार यांच्याकडे पाठपुरावा केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

15 नोव्हेंबरला शेवगाव-पैठण रोडवर घोटण येथे गंगामाई फाट्यावर शेतकरी संघटनेकडून ऊस वाहतूक रोखून आंदोलन करण्यात आले होते. परंतु या वेळी पोलिस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी मध्यस्थी करून आज 21 नोव्हेंबर रोजी शेवगाव तहसील कार्यालयावर पाथर्डीचे प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या अध्यक्षतेखाली ऊसदराबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु आज झालेल्या बैठकीला साखर कारखानदारांनी कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. 2700 रुपये प्रतिटन ऊसदरावर साखर कारखानदार ठाम राहिले. त्यामुळे आज तहसील कार्यालयामध्ये झालेली बैठक ही वादळी ठरली.

या बैठकीमध्ये कोणताही निर्णय न झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व शेतकरी आक्रमक होऊन त्यांनी साखर कारखानदारांचा तसेच शेवगाव-पाथर्डीचे लोकप्रतिनिधी यांचाही निषेध व्यक्त केला. या वेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे म्हणाले की, सर्व साखर कारखानदार यांचा अंतर्गत संगनमत होऊन 2000 रुपये दर हा अंतिम टप्प्यात जाहीर करण्यात आला, असा आरोप लवांडे यांनी केला.

या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, तालुका अध्यक्ष अशोक भोसले, शेवगाव तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष बबरु वडघणे, शेवगाव तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष रामजी शिदोरे, प्रशांत भराट तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते. तसेच कारखानदारांकडून साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

साखर कारखान्यांनी उसाला दर द्यावा...

अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेकडील साखर कारखाने हे 3100 रुपये दर देऊन दक्षिण भागातील ऊस घेऊन जात आहेत, उत्तरेतील साखर कारखान्यांना ऊसदर देण्यात परवडते, परंतु दक्षिणेतील साखर कारखान्यांना 3100 रुपये दर देण्यास परवडत नाही. तसेच जे कारखाने फक्त साखर गाळप करतात व जे कारखाने उपपदार्थ तयार करतात, यांचा एकच दर (2700)कसा ?, असा प्रश्न शेवगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मेजर अशोक भोसले यांनी उपस्थित केला.

(Edited By - Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT