नाशिक : तीन तलाकसंदर्भात केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर अमलबजावणीपासून तलाक देण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी मुस्लिम समाजाच्या विकासाला गती मिळून समस्या कमी झाल्या आहेत, असा दावा भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष एजाज देशमुख (Ajaj Deshmukh) यांनी केला.
शहर भाजपतर्फे वसंतस्मृती कार्यालयात अल्पसंख्याक मोर्चातर्फे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या माध्यमातून समाजहिताची कामे व्हावीत व त्यातून केंद्र सरकारच्या योजनांची माहिती घराघरापर्यंत पोचवावी व समाजाच्या विकासासाठी अहोरात्र काम करावे. मंडलापासून बूथ स्तरापर्यंत अल्पसंख्याक मोर्चाची रचना प्रभावीपणे व्हावी व बूथ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विकास कार्यक्रम घरोघरी पोचवावा. तीन तलाक कायदा येण्यापूर्वी मोठया संख्येने तलाक घेण्याचे प्रमाण होते. परंतु, कायदा अमलात आल्यापासून तलाक देण्याचे प्रमाण घटले आहे. परिणामी समाजाच्या विकासाला गती मिळाली आहे व सामाजिक समस्या कमी झाल्या आहेत.
यावेळी महापौर सतीष कुलकर्णी म्हणाले, अल्पसंख्याक समाजासाठी ३० वर्षांपासूनचा कब्रस्तान मुद्दा मार्गी लावला. यासाठी नाशिक महापालिकेच्या माध्यमातून आठ एकर जागा ६० कोटीमध्ये खरेदी करून १५ दिवसात ती जागा ताब्यात देणार आहे. आमदार फरांदे यांनी आमदार निधीतून बडी दर्ग्याचे सुशोभीकरण, मुख्य प्रवेशद्वार तसेच वाहनतळाची जागा, संरक्षण भिंत बांधणे तसेच इदगाह मैदानावरील नमाज पठण जागेवरील विकास कामांची माहिती दिली. प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी आडगाव, मखमलाबाद, नाशिक रोड येथील कब्रस्थानसाठी राबविण्यात आलेल्या विकास कामांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश पालवे यांनी भाजप शहर अल्पसंख्याक महिला मोर्चा कार्यकारिणी घोषित केली. काँग्रेसचे माजी नगरसेवक खलिल मिर्झा यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये या वेळी प्रवेश केला. या वेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, प्रदेश उपाध्यक्ष युसूफ पठाण, प्रदेश उपाध्यक्ष शेख सलीम चिश्ती, महामंत्री अतिक खान, सय्यद सलीम, प्रदेश सचिव अल्पेश पारख आदी उपस्थित होते. प्रास्ताविक फिरोज शेख यांनी केले. सूत्रसंचालन विकास पगारे यांनी केले. आभार रफिक शेख यांनी मानले.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.