Tanker Strike Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Tanker Strike Update : महसूलमंत्र्यांचा फोन येताच चक्रं फिरली; उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला मिळाला दिलासा

सरकारनामा ब्यूरो

अरविंद जाधव-

Tanker Strike Maharashtra News : हिट अँड रन कायद्यातील कठोर तरतुदींविरोधात पुकारलेल्या बंदमधून नाशिक जिल्ह्यातील पानेवाडी येथील टँकरचालकांनी अखेर माघार घेतली आहे. यामुळे किमान पेट्रोल व डिझेलचा पुरवठा राज्यातील काही भागांत सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील पानेवाडी परिसरात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल आदी प्रमुख कंपन्यांची गोदामे आहेत. याच ठिकाणांहून उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा होतो. यासाठी शेकडो टँकरचा वापर होतो.

हिट अँड रन कायद्याविरोधात वेगवेगळ्या वाहतूकदार संघटनांनी संप पुकारला. यात इंधन वाहतूक करणारे टँकरमालकही सहभागी झाले आहेत. यामुळे सोमवारी मध्यरात्रीपासूनच इंधनपुरवठा ठप्प झाला. शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंप कोरडेठाक पडले. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी सकाळी चर्चा केली. यात संपावर त्वरित तोडगा काढण्याचे निर्देश देण्यात आले.

जिल्हाधिकारी शर्मा आणि पोलिस अधीक्षक शहाजी उमप यांनी तातडीने पानेवाडी गाठून संपकरी टँकरमालकांसमवेत चर्चा केली. कायद्यातील तरतुदी समजावून सांगितल्या. इंधनपुरवठा सुरळीत करू. मात्र चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाल्यास पुन्हा संपाचे शस्त्र बाहेर काढण्यात येईल, असा इशारा देत टँकरमालकांनी संप मागे घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिकसह मराठवाड्याला दिलासा

इंधनपुरवठा सुरळीत होणार असल्याने नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे. त्रस्त वाहनधारकांना इंधनाचा मुबलक पुरवठा होईल. दरम्यान, नाशिकप्रमाणे राज्यातील संपावर काय तोडगा निघणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT