TCS Nashik case investigation update: नाशिकमधील TCS या बहुराष्ट्रीय कंपनीतील एका विवाहित तरुणाच्या धर्मांतराच्या प्रयत्नासह त्याला बळजबरीने मांसाहार करण्यास भाग पाडल्याच्या गुन्ह्यात तीन संशयितांना नाशिक सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
परंतु या तिघांनाही नाशिक शहरात राहण्यास परवानगी नाही. नाशिक शहरात त्यांना प्रवेशबंदी असून, प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी मुंबई नाका पोलिसांत हजर रहावे लागणार आहे. जामीन मिळाला म्हणजे सुटका झाली, या भ्रमात राहू नये असा इशाराच न्यायालयाने आपल्या आदेशातून दिला आहे. दाखल गुन्ह्यातील कोणत्याही पीडितांसह साक्षीदारांसोबत संपर्क साधू नये, असे स्पष्ट आदेश नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांना दिले आहेत.
TCS कंपनीत काम करणाऱ्या अविवाहित तरुणीवर बलात्कारासह तिच्या धर्मांतराच्या प्रयत्नाबाबत दाखल गुन्ह्यातील मुख्य संशयित निदा खान हिला देखील न्यायालयाने दिलासा दिला आहे. तब्बल महिनाभरानंतर नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने तिला सशर्त जामीन मंजूर केला आहे.
ती गरोदर असल्याने न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला. निदाला जामीन मंजूर करताना कोर्टाने श्रीकृष्णाच्या जन्माचा दाखला दिल्याने आदेशातील हा संदर्भ वादात सापडला आहे. हिंदू संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला आहे.
दरम्यान याच गुन्ह्यातील संशयित रझा रफिक मेमन, तौसिफ बिलाल अत्तार आणि शाहरूख हुसेन शौकत कुरेशी यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, तिघांनाही शहरात बंदी घालण्यात आली आहे. जामीन दिला असला तरी तिघांना शहरात नो एण्ट्री केल्याने हद्दपारीची शिक्षा भोगावी लागत आहे.
तिघाही संशयितांकडून पीडिता तसेच साक्षीदारांवर दबाव टाकला जाण्याचा संशय असल्यानेच, त्यांना न्यायालयाने शहरात बंदी घातली आहे. याशिवाय कायदा व सुव्यवस्था तसेच साक्षीदारांच्या सुरक्षेचा कडेकोट विचार करून संशयितांना हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.
याप्रकरणात नाशिकमधील मुंबई नाका पोलिसांनी वेळेत दोषारोपपत्र दाखल करीत गुन्ह्याचे गांभीर्य न्यायालयासमोर मांडले. सरकारी वकिलांनी देखील संशयितांच्या जामिनाला तीव्र विरोध केला.
मात्र, तपास पूर्ण झाल्यामुळे न्यायालयाने ५० हजारांच्या जातमुचलक्यावर संशयितांना जामीन मंजूर केला आहे. मात्र, शहरात प्रवेश बंदी केल्यामुळे संशयितांवर अप्रत्यक्षपणे हद्दपारीची कारवाई केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.