Mahavikas Aghadi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Teachers Constituency 2024: महाविकास आघाडीत फूट; शेवटच्या क्षणी काँग्रेसने 'या' ठिकाणी दिला उमेदवार

Sampat Devgire

Mahavikas Aaghadi News: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संंपताच आता महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीवरुन राजकारण तापू लागले आहे. शिक्षक मतदार संघटना निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी अतिशय वेगाने राजकीय घडामोडी घडल्या. त्यामुळे महायुती पाठोपाठ महाविकास आघाडीतही फूट पडली.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात संजीवनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त, भारतीय जनता पक्षाचे (BJP) विवेक कोल्हे अपक्ष उमेदवार आहेत. प्रवरा एज्युकेशन ट्रस्टच्या अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोघेही भाजपचे आहेत त्यामुळे महायुतीत फूट पडली.

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महायुतीच्या दोन घटक पक्षांचे तीन उमेदवार झाले आहेत. शेवटच्या क्षणी काय घडते, कोण माघार घेतो? याकडे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक संदीप गोपाळराव गुळवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर शुक्रवारी (ता.7) अनपेक्षितपणे काँग्रेसकडून डी. बी. पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पाटील यांनी काँग्रेसच्या एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) फूट पडल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, याबाबत काँग्रेसचे उमेदवार पाटील यांनी पक्षाच्या नेत्यांच्या सूचनेनुसार मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिक्षक वर्गात काँग्रेस पक्षाचे मोठ्या संख्येने अनुयायी व विचारधारेशी बांधिलकी असलेले शिक्षक आहेत. त्यामुळे प्रचारात नक्कीच आघाडी घेऊ. पक्षाने आदेश दिल्यास उमेदवारी मागे घेण्याची ही आपली तयारी आहे, असे सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT