प्रभू श्रीराम एकवचनी होते. मात्र पंतप्रधान मोदी राम मंदिराचा टूलकिटसारखा उपयोग करतात. 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करतात आणि लगेच त्यांना प्रवेश देतात. ते एकवचनी आहेत का? असा सवाल शिवसेनानेत्या सुषमा अंधारे यांनी केला.
अंधारे यांनी आपल्या भाषणात आज रामायण आणि महाभारताचा संदर्भ देत भाजपसह त्यांच्याबरोबर गेलेल्या भ्रष्ट व फुटीर नेत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. पंतप्रधान मोदी यांनी 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि लगेचच आरोप केलेल्या अजित पवारांना प्रवेश दिला. राष्ट्रवादी काँग्रेसची युती नाही, कधीच नाही, केव्हाही नाही, असे म्हणत म्हणत देवा भाऊ दोन-दोन वेळा लव्ह मॅरेज करतात. इतरांशी पळून जाऊन लव्ह मॅरेज करतात. यांना एकवचनी असण्याची व्याख्या तरी कळेल काय? असा सवाल अंधारे यांनी केला.
राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली. मात्र रामराज्य आणणार आहत का? ते तुम्हाला जमेल का? असा प्रश्न त्यांनी विचारला. रामराज्याची व्याख्या महात्मा गांधींनी सांगितली होती. जेव्हा मध्यरात्री बारा वाजताही महिला सुरक्षितपणे घराबाहेर पडेल ते रामराज्य. यांच्या राज्यात महिला दिवसाही सुरक्षित नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होतो. अत्याचार झालेल्या महिला खेळाडूंना धरणे धरावे लागते. राष्ट्रपतींना संसद आणि राम मंदिर सोहळ्यात कुठेही निमंत्रण दिले जात नाही. महिला सन्मान हे पायदळी तुडवतात. खरे एकवचनी आणि महिलांना सन्मान देणारे नेते उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी काळाराम मंदिराच्या पूजेला येताना पत्नीला सोबत आणले होते. पत्नीला पूर्ण अधिकार त्यांनी दिले. भाजप नेते राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला एकटेच तुरुतुरु पळत होते आणि पत्नी वनवासात होती, अशी टीका अंधारे यांनी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रामायणातून हरिण सोन्याचे नसते. मृगजळामागे धावायचे नसते, हा संदेश मिळतो. महाभारतातून सत्ता असत्याच्या बाजूने असेल तर, सुडाचे राजकारण होते. सत्ता कौरवांच्या बाजूने असताना आणि शकुनीमामा फासे त्यांच्या बाजूने टाकत होते, तोपर्यंत कौरव जिंकत होते. आजही गद्दार गॅंग आणि भ्रष्टाचारी यांचे तसेच असून राहुल नार्वेकर हे शकुनीसारखे त्यांच्यासाठी डाव टाकत आहेत. मात्र एकदा कुरुक्षेत्रावर लढाई होऊन जाऊ द्या, त्यात पांडवांचाच विजय होईल, असे त्या म्हणाल्या.
शिवसेनादेखील या गद्दारांना असाच पराभव दाखवेल. आताशी लढाई सुरू झाली आहे. सर्वच्या सर्व 40 गद्दारांना गाडल्याशिवाय आणि निवडणुकीत पाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.