Uddhav Thackeray Shivsena Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Thackeray VS BJP : भाजप-ठाकरे राजकीय युद्धात कारसेवक बजावणार महत्त्वाची भूमिका

Arvind Jadhav

Nashik Political News :

राम मंदिर आणि शिवसेनेचा संबंध काय? अशी टीका भाजपाकडून केली जाते. त्याला प्रत्युत्तर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) राज्यव्यापी अधिवेशनातील चित्रप्रदर्शनातून दिले आहे. या चित्रप्रदर्शनाचा आढावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी घेतला. तसेच 'गर्व से कहो हम हिंदू है' या टॅगलाईनने सुरू होणारा व्हिडीओदेखील पाहिला. आगामी काळातील प्रचारादरम्यान भाजपला या व्हिडीओद्वारेच उत्तर देण्याची रणनीती शिवसैनिकांनी आखली आहे.

शिवसेनेचे राज्यव्यापी अधिवेशन सातपूर येथील डेमोक्रसी हॉटेलमध्ये झाले. या अधिवेशनाला राज्यभरातील सेना पदाधिकारी, आमदार, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. उद्धव ठाकरेंचे भाषण सुरू असताना त्यांनी चित्रप्रदर्शनाला भेट देण्याचे आदेश सर्वांना दिले. तत्पूर्वी ठाकरे यांनी या चित्रप्रदर्शनाला भेट दिली. राम मंदिर आणि शिवसेना अशी या चित्रप्रदर्शनाची खास बाब आहे.

बाबरी मशीद पाडण्यापूर्वीची शिवसेनेची तयारी, कारसेवक, त्यांचा प्रवास, बाबरी पडल्यानंतर उसळलेल्या दंगली, त्यावेळी 'सामना'मधून प्रसिद्ध झालेले लेख, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे लेख असे वेगवेगळे पैलू चित्रप्रदर्शनातून समोर मांडण्यात आले आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई त्यावेळी कारसेवेत होते. तसे वृत्त आणि छायाचित्र 'सामना'मधून छापून आले होते. तरुणाईतील तो फोटो, पाठीवर बॅग घेतलेले देसाई सहजतेने ओळखू येत नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, शिवसेनेकडून कारसेवेत गेलेले आणि त्यावेळी आलेल्या अनुभवांचा एक व्हिडीओ शिवसेनेने तयार केला आहे. या व्हिडीओची सुरुवातच 'गर्व से कहो हम हिंदू है,' या बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजाने होते. यात सुभाष देसाई यांच्यासह इतर शिवसैनिकांनी आपल्याला आलेले अनुभव कथन केले होते. शिवसैनिक, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने जिवाचे रान करून बाबरी मशीद पाडली. त्यात भाजप कुठे होता, असा प्रश्न कारसेवक शिवसैनिकांकडून उपस्थित करण्यात आला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी हेच चित्रप्रदर्शन आणि व्हिडीओचा वापर होण्याची शक्यता आहे. हे चित्रप्रदर्शन शिवसेनेचा कारसेवेतील सहभाग दाखवते, शिवाय भाजपच्या अस्तित्वाचा प्रश्नही उपस्थित करते.

(Edited by Avinash Chandane)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT