Dhule Municiple corporation
Dhule Municiple corporation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

धुळे महापालिकेत पाठपुराव्यांचीही असते कॅटेगरी!

Sampat Devgire

धुळे : नगरसेवक (Dhule corporation) ही कामे आपापल्या प्रभागात व्हावीत, यासाठी पाठपुरावा करतो. मात्र, या पाठपुराव्यांचीही महापालिकेत ‘कॅटेगरी’ पडल्याचे चित्र पाहायला मिळते. आपण फॉलोअपमध्ये कमी पडलात, असा तोंडी शेराच एका कनिष्ठ अभियंत्याने (Administration) नगरसेवकाला मारला. ही पाठपुराव्याची ‘कॅटेगरी संस्कृती’ (Culture) कुणी निर्माण केली, त्याला खतपाणी कोण घालतंय, असा प्रश्‍न उपस्थित झाला.

महापालिकेच्या माध्यमातून शहरात कोट्यवधी रुपयांची कामे केली जातात. रस्ते, गटारी, जलवाहिन्या, शौचालये, मोकळ्या जागेला संरक्षक भिंत, सामाजिक सभागृह, पथदीपांची व्यवस्था अशा छोट्या-मोठ्या कामांचा यात समावेश असतो. मात्र ही कामे मंजूर करताना वेगळेच निकष लावले जात असल्याने सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संतापल्याचे चित्र आहे.

महापालिकेत भाजपची निर्विवाद सत्ता आहे. तब्बल ५१ नगरसेवकांचे पाठबळ असलेल्या भाजपच्या तीन वर्षांच्या सत्ताकाळानंतरही अनेक सत्ताधारी नगरसेवक प्रभागातील कामांबाबत मात्र प्रचंड नाराज आहेत. कामांची मंजुरी अथवा प्रलंबित राहण्यामागे ‘कॅटेगरी संस्कृती’ असल्याचा मुद्दा नुकताच पुढे आला आहे. एखाद्या नगरसेवकाची कामे मंजूर होत असताना इतर काही नगरसेवक मात्र प्रतीक्षेतच बसलेले आहेत.

स्थायी समितीच्या गेल्या काही सभांमध्ये सत्ताधारी भाजपचे सदस्य हर्षकुमार रेलन, नागसेन बोरसे, नरेश चौधरी, किरण अहिरराव आदींनी आपापल्या प्रभागातील कामांची मागणी लावून धरल्याचे पाहायला मिळाले. श्री. रेलन यांनी तीन वर्षांपासून (अर्थात ते नगरसेवक झाल्यापासून) आपण प्रभागातील कामांचे प्रस्ताव दिले आहेत.

यासाठी संबंधित विभागप्रमुखांकडे पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केला. तरीही ही कामे का मंजूर झाली नाहीत, इतर नगरसेवकांची कामे कशी मंजूर झाली, असा त्यांचा रास्त प्रश्‍न होता. कामांच्या यादीत एका नगरसेवकाची तब्बल ७० कामे असल्याचा दावाही त्यांनी केला. श्री. रेलन यांच्यासारखीच स्थिती इतर काही नगरसेवकांचीही आहे. त्यामुळे कामांमध्ये हा दुजाभाव का, याचे उत्तर समोर येणे गरेजेचे आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी नगरसेवकांचमध्येच असा दुजाभाव असेल, तर विरोधकांची काय गत असेल, हाही प्रश्‍नच आहे.

कॅटेगरीचा उगम

श्री. रेलन यांनी आपली कामे ‘डी’ वर्गवारीत कशी, असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यापुढे जाऊन सदस्य श्री. अहिरराव यांनी डी-१, डी-२ पर्यंतही वर्गवारी असल्याचे नमूद केले होते. या प्रश्‍नांवर प्रशासनाकडून अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस यांनी कामांची प्रशासकीय मान्यता, कार्यादेश आदी मुद्यांवर ही वर्गवारी केल्याचे उत्तर दिले. मात्र, या उत्तरातच अनेक प्रश्‍न दडले आहेत.

हे पाठपुराव्याचे प्रकार का?

नगरसेवकांनी कामे सुचविल्यानंतर प्रस्ताव दिल्यानंतर त्याची पुढील प्रशासकीय कार्यवाही प्रशासनाकडून होणे आवश्‍यक आहे. मात्र, ही प्रक्रिया करताना काही नगरसेवकांना झुकते माप कसे मिळते, असा प्रश्‍न आहे. रात्रंदिवस अधिकाऱ्यांच्या मागेपुढे फिरणे, अधिकाऱ्यांच्या दालनांमध्ये ठाण मांडून बसणे, प्रसंगी ॲन्टी चेंबरमध्ये चर्चा करणे, सभांमध्ये अधिकारी अडचणीत येईल, असे प्रश्‍न न विचारणे, वेगळा रुबाब अन् दबदबा असणे अशा कॅटेगरीतल्या नगरसेवकांची कामे मंजूर करायची. ज्यांच्याकडे हे स्कील नाही, ज्यांचा दबदबा नाही त्यांची कामे पेंडिंग ठेवायची, असे हे पाठपुराव्यांचे प्रकार आहेत का, याचेही उत्तर येणे आवश्‍यक आहे

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT