Maharashtra Tribal Development News: भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबरपासून केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने ‘जनजातीय गौरव सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य, शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने विविध निर्णय घेतले आहेत. आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत काही दिवसांपूर्वी तक्रारी समोर आल्यानंतर शासकीय आश्रमशाळांमध्ये पूर्णवेळ परिचारिकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे मंत्री पंकज भोयर यांनी बुधवारी (ता. ११ नोव्हेंबर) वर्ध्यातील पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांची जयंती ‘जनजातीय गौरव सप्ताह’ म्हणून साजरी करण्यात येणार आहे. क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा हे केवळ अनुसूचित जमातीचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांची जयंती एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण आठवडाभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पंकज भोयर यांनी सांगितले.आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पूर्णवेळ परिचारिकांची नियुक्ती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वर्धा जिल्ह्यात ११ टक्क्यांपेक्षा अधिक आदिवासी लोकसंख्या असूनही यापूर्वी आदिवासी प्रकल्प कार्यालय नागपूर येथे असल्याने स्थानिक नागरिकांना विविध कामांसाठी नागपूरला जावे लागत होते. यावर वर्धा जिल्ह्यासाठी स्वतंत्र आदिवासी प्रकल्प कार्यालय, निधी आणि आवश्यक मनुष्यबळ मंजूर करून घेतल्याचे भोयर यांनी सांगितले. सध्या हे कार्यालय स्वतःच्या इमारतीत पूर्ण मनुष्यबळासह काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना पुरक शिक्षण मिळण्यासाठी ‘वीर राघोजी भांगरे शिष्यवृत्ती योजना’ सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले असून वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि प्रशासनाशी समन्वय साधण्यासाठी छात्रावास समन्वय समितीची स्थापना केली आहे. आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘उमेद’ अभियानाच्या धर्तीवर राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजना राबवत असल्याचेही पंकज भोयर यांनी नमूद केले.
आदिवासी समाजाची कला आणि संस्कृती जतन करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पारंपरिक गोंडी नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.याचबरोबर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आदिवासी आश्रमशाळांमध्ये २,५०० पेक्षा अधिक गुणवत्ताधारक शिक्षकांची पारदर्शक पद्धतीने भरती केल्याचा दावाही पंकज भोयर यांनी केला.
दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांचे प्रथमच सर्वेक्षण करण्यात येत असून या सर्वेक्षणातून त्यांची माहिती संकलित करून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम सुरू असल्याचेही भोयर यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.