Nashik Politics : त्र्यंबकेश्वर नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कैलास घुले यांचा पराभव झाला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या त्रिवेणी तुंगार नगराध्यपदी निवडून आल्या आहेत.
त्र्यंबकेश्वर नगरपरिषद ही कुंभमेळ्याच्या दृष्टीने भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची होती. कुंभमेळा डोळ्यासमोर ठेऊन शहराचे प्रथम नागरिकपद आपल्याकडेच असावे यासाठी भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली होती. भाजपचे कैलास घुले, राष्ट्रवादीचे सुरेश गंगापूत्र व शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार यांच्यात प्रमुख लढत झाली.
त्र्यंबकेश्वरचा गड राखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा नारळही त्र्यंबकेश्वरमध्येच फोडला होता. विशेष म्हणजे शर्थीचे प्रयत्न करूनही इथे महायुती एकत्र आली नव्हती. कुंभमेळ्याचं आयोजन करण्याची जबाबदारी घेतलेले मंत्री गिरीश महाजन इथे तळ ठोकून होते. पण कैलास घुले यांच्या पराभवाने मंत्री महाजन यांना मोठा धक्का बसला आहे.
नगराध्यक्षपदासाठी पाच पक्षीय उमेदवारांसह आठ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पंरतु, येथे दुरंगी लढत झाल्याचे बघायला मिळाले.
नगराध्यक्षपदी शिंदे सेनेच्या त्रिवेणी तुंगार-सोनवणे विजयी झाल्या असून, भाजपचे कैलास घुले यांचा तब्बल १८०० मतांनी दारुण पराभव झाला आहे. तर याठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सात, भाजपचे सहा आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. तर दोन अपक्ष निवडून आलेत.
बारा हजार चारशे मतदारसंख्येच्या त्र्यंबकेश्वर पालिकेत यंदा दहा प्रभागांमधून वीस नगरसेवक निवडून देण्यात आले आहे. यापूर्वी आठ प्रभागांमधून सतरा सदस्य निवडले जात असत. लहान पालिका आणि मुख्यत्वे आदिवासी बहुल क्षेत्र असल्याने पालिकेच्या उत्पन्नाला मर्यादा आहेत. त्यामुळे शासनाच्या विविध अनुदानांवर विकासकामे अवलंबून असतात. मात्र यंदा कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील गणिते वेगळी होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.