Sinnar BJP Politics: प्रत्येक निवडणुकीला सिन्नर तालुक्यात पक्षांतर होते. पक्षांतराचे हे वारे आता जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत पोहोचले आहेत. यंदा मात्र त्यात सिन्नर आणि दिंडोरीच्या राजकारणात योगायोग आहे.
पक्षांतराची चाहूल लागल्याने उदय सांगळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आधीच बडतर्फ केले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज ते भाजपमध्ये प्रवेश करतील. जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यापुढे ठेवून हा प्रवेश होत आहे.
सिन्नर तालुक्यात भाजप अथवा कोणत्याही राजकीय पक्षाला अद्यापपर्यंत कधीही फारसे स्थान नव्हते. यंदा सामाजिक विभागणीमुळे उदय सांगळे भाजपला किती लाभ मिळवून देतात हे निवडणुकीच्या निकालानंतर समजेल. उदय सांगळे हे सिन्नरच्या राजकारणात तिसरी शक्ती म्हणून पुढे येण्यासाठी धडपडत आहेत.
यानिमित्ताने सिन्नर आणि दिंडोरी तालुक्याच्या राजकारणात योगायोग दिसतो आहे. लोकसभा निवडणुकीला सर्व पक्ष आणि गट सिन्नरला महाविकास आघाडी अर्थात खासदार राजाभाऊ वाजे, दिंडोरीला खासदार भास्कर भगरे यांच्या पाठीशी दिसले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे अर्थात महायुती सोबत गेले.
नेते कुठेही असले आणि कोणत्याही पक्षाचा प्रचार करीत असले तरी कार्यकर्ते ठाम दिसतात. उमेदवारांचा व्यक्तिगत संपर्क आणि पक्ष त्याला कारणीभूत होते. त्यामुळेच दिंडोरी आणि सिन्नरच्या राजकारणातील योगायोग पुन्हा चर्चेत आला आहे.
जिल्हा परिषद ही कार्यकर्त्यांची निवडणूक मानली जाते. ज्याची राज्यात सत्ता अथवा तालुक्यात आमदार त्याच्या कलाने निकाल लागण्याची परंपरा आहे. त्या दृष्टीने दिंडोरी आणि सिन्नर येथील आमदारांनी स्वबळाची तयारी केली आहे. त्यात आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याबरोबरच मुलांना राजकारणात स्थिर करण्याचा देखील हेतू झिरवाळ आणि कोकाटे दोघांचाही आहे.
सिन्नरच्या राजकारणात खासदार राजाभाऊ वाजे आणि क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे हे दोन गट आहेत. सर्व कार्यकर्ते, नेते त्यात विभागले आहेत. त्यांच्यात राजकीय सामंजस्य असल्याने केव्हा लढायचे आणि केव्हा शांत बसायचे हे त्यांना नक्की ठाऊक आहे.
खासदार वाजे आणि मंत्री कोकाटे या दोन्हींच्या गटात उदय सांगळे यांना प्रवेश आणि स्थान नाही. लोकसभेला माजी खासदार हेमंत गोडसे यांना निवडणुकीआधीच समर्थन देऊन सांगळे फसले. त्याची मोठी किंमत त्यांना विधानसभेला मोजावी लागली.
उदय सांगळे आता भाजप पक्षात प्रवेश करीत आहेत. यानिमित्ताने भाजपची साम, दाम, दंड भेद ही नीती त्यांच्या पाठीशी उभी राहील. मात्र सामाजिक दृष्ट्या सांगळे यांना कोणते मतदार जवळ करतील हा प्रश्न आहे. सामाजिक विभागणीमुळे दोन ते तीन गटात सांगळे आपल्या प्रभाव दाखवू शकतात.
खासदार वाजे यांनी तेथे चमत्कार केला तर सांगळे यांना जिल्हा परिषद देखील सोपी नसेल. त्यामुळे सांगळे भाजपमध्ये गेले काय आणि व्यक्तिशः (अपक्ष) निवडणुकीत उतरले काय चित्र तेच राहिले असते. मात्र या निमित्ताने सांगळे यांना गिरीश महाजन अर्थात राज्यातील सत्ता आणि आगामी कुंभमेळा आपल्या सोयीसाठी खुणावतो आहे. त्यांचे समर्थक काय करतात? याला महत्व असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.