Nashik Politics : नाशिक जिल्ह्यात काल मंगळवार (दि. १८) मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. कालचा दिवस उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी धक्कादायक ठरला. उद्धव ठाकरेंना भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाने दोघांनीही दणका दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असतानाच मोठं खिंडार ठाकरे गटाला पडलं.
मालेगाव बाह्य मतदारसंघात प्रभाव असलेले शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अद्वय हिरे यांनी काल भाजप मध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाने हिरे यांना मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेना(शिंदे गटाचे) दादा भुसे यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. त्यांना तिसऱ्या क्रमाकांची मते मिळाली होती.
हिरे घराणे हे मालेगावच्या राजकारणातील प्रसिद्ध घराणे आहे. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांचे ते कट्टर विरोधक आहेत. अद्वय हिरेंना कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना असे इकडून तिकडे अनेकदा पक्षांतर केले आहे. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते आपल्या समर्थकांसह पुन्हा भाजपत गेले आहेत. जिल्हाबॅंकेतील एका प्रकरणाचे शुक्लकाष्ट त्यांच्या मागे असल्याने ते भाजपत गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
उद्धव ठाकरेंना दुसरा धक्का बसला तो येवला मतदारसंघात. येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संभाजी पवार यांनी आपले काका माजी आमदार मारुती पवार यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत येवल्यातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीची वाट धरली.
मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात संभाजी पवार यांनी दोनवेळा विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र दोन्ही वेळा त्यांचा भुजबळांसमोर टिकाव न लागल्याने पराभव झाला. आपल्या राजकीय अस्तित्वासाठी ते अखेर भुजबळांना शरण आले. काल मुंबई येथे अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांनी व माजी आमदार मारुती पवार यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घातले.
संभाजी पवार यांच्यासह येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रतन बोरनारे, जिल्हा दुध संघाचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब खैरनार, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अर्जुन कोकाटे, शिवसेना उपतालुका प्रमुख व येवला माजी सभापती पुंडलिकराव पाचपुते यांच्यासह येवल्याती शेकडो स्थानिक नेत्यानी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.