Chandrakant Raghuwanshi
Chandrakant Raghuwanshi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

उद्धव ठाकरे यांनी धडगावला २७ नव्या ग्रामपंचायती दिल्या!

Sampat Devgire

नंदुरबार : धडगाव (Nandurbar) तालुक्यातील एकाच ग्रामपंचायतीमध्ये अनेक गावांचा समावेश होता. त्यामुळे तेथील अनेक गावांमध्ये विकासकामे (Rural Devolopment) होण्यास अडचणी येत होत्या, तर शासकीय योजनांचाही पुरेसा लाभ ग्रामस्थांना मिळत नव्हता, त्यामुळे आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांच्याकडे ही कैफियत मांडून ग्रामपंचायत विभाजन करून नवीन ग्रामपंचायती निर्मितीची मागणी केली होती. त्यासाठी सतत पाठपुरावा केल्यामुळे मागणीला यश आले. शासनाने २७ नवीन ग्रामपंचायती निर्मितीस मंजुरी दिल्याची माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuwanshi) यांनी दिली.

जिल्ह्यातील दऱ्याखोऱ्यांत वसलेल्या आदिवासी बांधवांचा विकास साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील मोठ्या आणि दूरवरच्या ग्रामपंचयातींचे विभाजन करण्याची मागणी शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली होती. अक्राणी येथे विधानसभा प्रचारावेळी आले असतानाच शिवसैनिकांनी जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींचे विभाजन का आवश्यक आहे याची कारणे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनासा आणून दिली होती.

त्याअनुषंगाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, जिल्ह्यात नव्याने अनेक ग्रामपंचायतींची निर्मिती झाली आहे. या ग्रामपंचायत विभाजनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी विशेष प्रयत्न केल्याने जिल्ह्यातील महाविकास आघाडीतर्फे या नेत्यांचे विशेष आभारदेखील मानत आहेत.

विभाजनानंतरची रचना

विभाजनानंतर मांडवी बुद्रुक या मोठ्या ग्रामपंचायतीचे विभाजन करून या ठिकाणी नव्याने आठ ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या आहेत. यात ११ गावांचा समावेश करण्यात आला आहे, तर तोरणमाळ ग्रामपंचायतीचे विभाजन करून या ठिकाणीदेखील नव्याने आठ ग्रामपंचायती निर्माण करण्यात आल्या आहेत. तोरणमाळमधील या आठ ग्रामपंचायतींमध्ये दहा गावे समाविष्ट असणार आहेत, तर तिकडे भुषा ग्रामपंचायतीचे विभाजन करून या ठिकाणी नव्याने तीन ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात आली आहे. या तीन ग्रामपंचायतींमध्ये नऊ गावांचा समावेश असणार आहे. धडगावमधल चिचकाठी ग्रामपंचायतीचे विभाजन करून चिचकाठी आणि चांदसैली अशा दोन ग्रामपंचायती निर्माण करण्यात आल्या आहेत. राजबर्डी ग्रामपंचायतीचे विभाजन करून नव्याने सात ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात आली आहे. यात सात ग्रामपंचायतीमध्ये दहा गावांचा समावेश असणार आहे. अशा पद्धतीने आता धडगाव तालुक्यात नव्याने २७ ग्रामपंचायतींची निर्मिती झाली आहे. नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे ग्रामपंचायतीचेदेखील विभाजन होऊन आता घुली आणि राकसवाडे अशा दोन स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या आहेत.

या सर्व ग्रामपंचायत विभाजनासाठी तीन ते चार महिने सातत्याने पाठपुरावा केला. या सर्व ग्रामपंचायती विभाजनाबाबत जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके, कृषी सभापती गणेश पराडके, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पराडके यांनी मुख्यमंत्र्यांसह साऱ्याच मंत्र्यांचे आभार मानले. नव्याने निर्माण झालेल्या ग्रामपंचायतींचे मुख्यालय गावातच अथवा नजीकच्या गावात असल्याने अनेक दाखले, महत्त्वाच्या कामांसाठी दऱ्याखोऱ्यातल्या आदिवासी माणसांना मदत होणार असून, अतिदुर्गम भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत विभाजनाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT