Vasant Gite & Devyani Pharande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`या` प्रभागाच्या निवडणुकीत आमदार देवयानी फऱांदे आणि वसंत गितेंची प्रतिष्ठा पणाला!

शहरातील या प्रभागातील लढत वसंत गिते- देवयानी फरांदे यांच्यासाठी महत्त्वाची

Sampat Devgire

नाशिक : भाभानगर परिसर माजी महापौर, माजी आमदार वसंत गिते (Vasant Gite) यांचे होम ग्राऊंड. नुकतेच भाजपमधून स्वगृही शिवसेनेत (Shivsena) दाखल झाले आहेत. हा परिसर गिते यांच्या प्रतिस्पर्धी भाजप आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांच्या मतदारसंघात मोडतो. त्यामुळे प्रभाग १७ मध्ये उमेदवार कोणीही असला तरीही राजकीय प्रतिष्ठा वसंत गिते आणि आमदार फऱांदे यांचीच पणाला लागणार आहे.

नव्याने तयार झालेल्या या प्रभागात जातीय समीकरणे महत्त्वाची ठरणार आहे. प्रारूप प्रभागरचनेत अनेकांना हा प्रभाग सोईचा वाटत असल्याने इच्छुकांमध्ये अनुभवी राजकारण्यांचाच समावेश अधिक दिसून येत असून विशेष म्हणजे प्रत्येक जण आपल्यासाठी प्रभाग कसा सोईस्कर आहे याचीच चर्चा करताना दिसतात. विद्यमान आमदार प्रा. देवयानी फरांदे व माजी आमदार वसंत गिते या दोघांसाठी येथील लढत महत्त्वाची आहे.

भाजप, शिवसेने या दोन पक्षांमधील लढती व्यतिरिक्त मनसे व काँग्रेसला येथून विजयाच्या आशा असल्याने कुठल्याही एकाच पक्षाची दावेदारी भविष्यात राहणार नाही, असे सध्या तरी दिसून येत आहे. तीन सदस्यांच्या प्रभागात प्रत्येक पक्षात एक प्रबळ उमेदवार येथे आहे. परंतु, दोघांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी जातीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू आहे.

२०१७ चा प्रभाग १२ व प्रभाग क्रमांक १५ चे विभाजन करून नव्याने सतरा क्रमांकाचा प्रभाग अस्तित्वात आला आहे. यापूर्वी कायम कुठल्या ना कुठल्या भागाला जोडलेला असल्याने स्वतःचे अस्तित्व नव्हते, परंतु यंदाच्या रचनेत या प्रभागाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले आहे. महामार्ग ओलांडता येत नाही, असा नियम असताना येथे मात्र नियमांची तोडमोड झाल्याचे दिसते. मुस्लिमबहूल मतदान तुटल्याने भाजप व शिवसेनेत लढत दिसून येत आहे. परंतु या लढती बरोबरच मनसे व काँग्रेसशी अनेक भागात दोन हात करावे लागणार आहे. वसंत गिते व देवयानी फरांदे यांच्यासाठी येथील लढत महत्त्वाची ठरेल. असे असले तरी पॅनलपेक्षा आपले स्वतःचे उमेदवार निवडून आणण्याकडेच अधिक कल राहण्याचा अंदाज आहे.

इच्छुकांच्या यादीत दिग्गज

या प्रभागात स्थानिकांसह सर्वच पक्षांत इच्छुकांची गर्दी आहे. यामध्ये प्रामुख्याने नगरसेवक व माजी उपमहापौर प्रथमेश गिते, मनसेच्या सुजाता डेरे व संदीप लेणकर, प्रशांत जाधव, अपक्ष व सध्या काँग्रेसच्या वाटेवर असलेले मुशीर सय्यद, गुलजार कोकणी, धनंजय बेळे, प्रेरणा बेळे, सुजाता करजगीकर, सुभान शेख, धीरज शर्मा, संजना लासुरे, पूजा आहेर, दीपा कमोद, योगिता कमोद, दिनेश कमोद, नंदकुमार देसाई, अनिता देसाई, अक्रम खतीब, राहत काझी, मिलिंद सावंत यांचा समावेष आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT