Sujay Vikhe and Vikram Rathod Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar Politics : ''निवडून नगर दक्षिणेतून यायचं अन् साखर उत्तरेत वाटायची'' ठाकरे गटाचा खासदार विखेंवर निशाणा!

Sujay Vikhe and Vikram Rathod : उत्तरेला दिवाळी आणि नगरला काय शिमगा आहे का? असा सवालही युवा सेनेचे प्रदेश उपप्रमुख विक्रम राठोड यांनी उपस्थित केला आहे.

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : उत्तर नगर जिल्ह्यातील सध्या सुरू असलेली साखर पेरणीवर आता दक्षिणेतल्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे. यात दक्षिणेतून निवडून आलेले भाजप खासदार सुजय विखे यांना शिवसेनेने निशाण्यावर घेतले आहे. निवडून दक्षिणेतून यायचे आणि साखर उत्तरेत वाटण्यावरून विखेंना घेरण्याचा प्रयत्न आता सुरू झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा सेनेचे प्रदेश उपप्रमुख, माजी नगरसेवक विक्रम राठोड यांनी खासदार विखेंवर उत्तरेची दिवाळी गोड करत असताना दक्षिणेची दिवाळी मात्र कडू करत असल्याची बोचरी टीका केली आहे.

नगर दक्षिण निवडणुकीत उपरा उमेदवार म्हणून आलेले सुजय विखे हे नगर उत्तरेत शिर्डी लोकसभा मतदारसंघात साखर वाटत फिरत आहेत. प्रत्यक्षात त्यांनी नगर दक्षिणेत साखर वाटणे अपेक्षित होते. मात्र, नगर दक्षिणचे खासदार उत्तरेत साखर वाटतात. तेव्हा दक्षिण नगर करांची दिवाळी कडू करताना उत्तरेला दिवाळी आणि नगरला काय शिमगा आहे का? असा सवाल राठोड यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत एक पत्रक त्यांनी प्रसिद्धीला दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ''नगर दक्षिणचे खासदार म्हणून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविताना तुम्हाला गोड वाटले. परंतु निवडून आल्यानंतर प्रत्येक दिवाळी आपण उत्तरेतील जनतेबरोबर साजरी करता. त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात. त्यांचे प्रश्न अडीअडचणी प्राधान्याने सोडवता. मग नगर दक्षिणविषयी सापत्न भाव का ठेवता? असा सवाल राठोड यांनी खासदार विखेंना विचारला आहे.''

त्याशिवाय ''त्या निवडणुकीत शिवसेनेनेदेखील आपला मनापासून प्रचार केला. आपल्याला घराघरात आणि मनात पोहोचवून तुम्हाला मोठे मताधिक्य दिले. परंतु आपण वेळोवेळी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावर अन्यायच केला. नगरचा निधी शिर्डीला वळवला. आता साखरदेखील तिकडेच वाटत आहात. मध्यंतरी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांना नगरला न आणता शिर्डीला आणले. ''

''शासन आपल्या दारी हा कार्यक्रमदेखील नगरच्या जिल्हा मुख्यालयात व्हायला हवा होता, पण तोदेखील तिकडेच साजरा केलात. मागे पशू आणि दुग्धविकास मंत्रालयाचे राष्ट्रीय पातळीवरील पशू प्रदर्शन आपण शिर्डीलाच घेतले. समृद्धी महामार्ग आपल्या मतदारसंघातून नेत असताना नगर कोपरगाव रस्ता तसाच वाऱ्यावर सोडला. आपण नगर पुणे इंटरसिटी रेल्वेसाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. निदान शिर्डी मुंबई तरी नगर पुणे मार्गे सुरु करा,'' असे राठोड यांनी म्हटले आहे.

याशिवाय ''कर्जत जामखेडला एमआयडीसी सुरू होऊ देण्याऐवजी आपण तिला विरोधच केलात. उलट उत्तरेला एमआयडीसी दिली. विमानतळ करतानादेखील आपण नगर दक्षिण मतदारसंघाला प्राधान्य दिले नाही. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे प्रस्तावित असताना, नगर शहराचा प्रस्ताव कुठे गायब झाला याची उत्तरे आपण द्यावीत आणि नरक यातना भोगत असलेल्या नगर दक्षिणेतील जनतेचा कडू घास काढण्यासाठी तरी नगरला यावे,'' असा टोला राठोड यांनी लगावला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT