Vilas Shinde & Vinayak Pande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिवसेनेनेच्या निवडणुक कोअर कमिटीत विलास शिंदे, विनायक पांडेंची नियुक्ती

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रीय होत पक्षांतर्गत नाराजी कमी करण्यावर भर.

Sampat Devgire

नाशिक : निवडणुकीपूर्वी (NMC) शिवसेनेत झालेल्या राड्यामुळे हातची सत्ता गेल्याचा अनुभव पाठीशी असल्याने पक्षांतर्गत नाराजी कमी करण्याचा भाग म्हणून सुनील बागूल (Sunil Bagul) यांना उपनेतेपद बहाल केल्यानंतर आता माजी महापौर विनायक पांडे, (Vinayak pande) महापालिकेचे गटनेते विलास शिंदे यांचा निवडणूक तिकीट वाटपासाठी तयार करण्यात आलेल्या कमिटीमध्ये समावेश करण्याची घोषणा करण्यात आली. सात जणांची कमिटी उमेदवार ठरविणार असली तरी भविष्यात कमिटीत आणखी सदस्य वाढण्याची शक्यता आहे.

२०१७ मध्ये पार पडलेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना सत्तेत येईल, असा विश्‍वास पक्षाच्या नेत्यांना होता. परंतु, पक्षाचे एबी फॉर्म वाटपावेळी बोरस्ते व पांडे समर्थकांमध्ये वाद निर्माण होऊन एबी फार्मची पळवापळवी, तसेच फॉर्म फाडण्याचे प्रकार घडले. शिवसेनेच्या या नियोजित राड्यामुळे पक्षांतर्गत गटबाजीचे नाशिककरांना दर्शन झाले. परिणामी नगरसेवकांची संख्या ३५ पर्यंत मर्यादित राहीली. सिडको व नाशिक रोड वगळता शिवसेनेच्या पदरी अपेक्षित यश पडले नाही.

मध्य विधानसभा मतदारसंघात अजय बोरस्ते व पंचवटी विभागात पुनम मोगरे यांच्या व्यतिरिक्त एकही सदस्य शिवसेनेला निवडून आणता आला नाही. परंतु, यंदा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने महापालिकांवर सत्ता स्थापन करण्यासाठी कंबर कसली आहे. नाशिक महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेला अधिक अपेक्षा आहे. परंतु, पुन्हा नाराजी उफाळून येवू नये म्हणून साइड ट्रॅक करण्यात आलेल्या नेत्यांना पदाचा मान दिला जात आहे.

सुनील बागूल यांच्याकडे उपनेते पदाची जबाबदारी दिल्यानंतर माजी महापौर विनायक पांडे यांची नाराजी अंगावर येवू नये म्हणून कोअर कमिटीत समावेश करण्यात आला, तर महापालिकेचे गटनेते विलास शिंदे यांनाही समावून घेण्यात आले.

नेत्यांच्या मक्तेदारीला आळा

उमेदवारीचे तिकीट वाटप करताना मक्तेदारी निर्माण होवू नये म्हणून पाच जणांची कोअर समिती स्थापन करण्यात आली. संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड व विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांचा कमिटीमध्ये समावेश आहे. आता पांडे व शिंदे यांचा समावेश करण्यात आला. पक्षाचा विस्तार करणे, कामकाजाची रूपरेषा ठरविणे, निवडणूक रणनीती, इच्छुकांची ताकद अजमावणे, उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्याची जबाबदारी कोअर कमिटीची आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT