MLA Kishor Patil
MLA Kishor Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मंत्रीपदाचे काय, मी स्वतःला मुख्यमंत्री समजतो!

Sampat Devgire

पाचोरा : राज्यात (Maharashtra) सत्तेत आलेल्या बाळासाहेबांची शिवसेना (Balasaheb`s Shivsena) व भाजप (BJP) प्रणित शिंदे -फडणवीस सरकारने दिवाळीनंतर मंत्रिमंडळ विस्तार (Expansion of cabinet) करण्याचे जाहीर केले असून, या संदर्भात पाचोरा -भडगाव (Pachora-Bhadgaon) विधानसभा मतदारसंघाचे बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी मंत्रिपदाचे काय घेऊन बसलात, मी स्वतःला मुख्यमंत्री समजतो व कामे करीत आहे, असे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले. (Kisho patil appriciate state government`s working procedure)

शिंदे- फडणवीस सरकारने गेल्यावेळी केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारप्रसंगी आमदार किशोर पाटील यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आले होते. परंतु त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्या संदर्भात आमदार पाटील नाराज असल्याचा सूर व्यक्त होत होता. त्याबाबत माध्यम प्रतिनिधींनी त्यांना छेडले असता त्यांनी स्पष्ट केले, की मंत्रिपदाच्या शर्यतीत होतो, आजही आहे.

ते म्हणाले, प्रत्येक लोकप्रतिनिधीला ती अपेक्षा असतेच. मंत्रिपद मिळाले तर नक्कीच संधीचे सोने करेल. राज्याच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावेल. परंतु मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मी मुळीच नाराज झालो नाही व होणार ही नाही. कारण मी स्वतःला मुख्यमंत्री समजतो व त्या अनुषंगाने मतदारसंघात विकासकामांचा धडाका सुरू ठेवला आहे.

‘मविआ’ सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात जेवढे निर्णय झाले नाहीत व जेवढे प्रश्न मार्गी लागले नाहीत तेवढे शिंदे - फडणवीस सरकारने शंभर दिवसात महत्त्वाचे निर्णय घेऊन विषय मार्गी लावले. सर्वसमावेशक कामे करून सर्व राज्यातील जनतेला दिलासा दिला.

नायक चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामे करून दाखवली. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. विरोधकांना काय विरोध करायचा तो करू द्या, ते त्यांचे कामच असते. आपण मात्र कामे करीत राहावे व जनतेच्या मतांची कामांच्या माध्यमातून परतफेड करत राहावे, या विचाराने मी वावरतो. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मविआसोबत राहण्याचा व भविष्यात त्यांचे सोबतच निवडणुका लढण्याचा घेतलेला निर्णय त्यांना अधोगतीकडे नेणारा असल्याचे स्पष्ट करून 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' असे म्हटले जात असले तरी ठाकरेंना ठेचांवर ठेचा लागत असल्या तरीही ते शहाणे होणार नसतील तर परमेश्वर त्यांचे भले करो,’ असा चिमटा त्यांनी काढला व मतदार संघातील जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा ही व्यक्त केल्या.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT