MLA Dilip Borase & Ex MLA Deepika Chavan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

बागलाणच्या आमदार कोण? भाजपचे बोरसे की राष्ट्रवादीच्या दीपिका चव्हाण!

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्शभूमीवर दीपिका चव्हाण यांनीच केली निधीची मागणी

Sampat Devgire

सटाणा : गेल्या दोन वर्षांपासून बागलाण (Baglan) तालुक्यात विकासाचा अनुशेष निर्माण झाला असून, तालुक्यातील प्रलंबित असलेल्या सिंचन, रस्ते व वीजेसह इतर विकासकामांसाठी सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Assembly session) ६० कोटी रुपयांची भरीव तरतूद करावी, अशी आग्रही मागणी बागलाणच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण (Deepika Chavan) यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे केली आहे. (Baglan news Updates)

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. तालुक्याचे आमदार दिलीप मंगळू बोरसे आहेत. त्यांच्या क्षमतेने ते काम करीतच असतात. मात्र माजी आमदार चव्हाण यांनी मतदारसंघासाठी निधी मागितला आहे. त्यामुळे बागलाण मतदारसंघाचे आमदार नक्की कोण अशी चर्चा सुरु झाली आहे.

मंगळवारी श्रीमती चव्हाण यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री ना. पवार, जलसंपदामंत्री श्री. पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. शुक्रवारी अधिवेशनात सादर होणाऱ्‍या राज्याच्या अर्थसंकल्पात बागलाण तालुक्यासाठी भरीव निधीच्या तरतुदीसाठी चर्चा केली. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी व जनतेला हक्काचे पाणी, हक्काची वीज आणि दळणवळणाच्या सुविधांसाठी चांगल्या दर्जाच्या रस्त्यांची आवश्यकता असते.

त्यामुळे तालुक्यातील रस्ते, सिंचन आणि ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्रासह इतर विकासकामांबाबत शासनाकडे सविस्तर प्रस्तावही सादर केल्याचे निवेदनात म्हटले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागासह अतीदुर्गम आदिवासी भागातील रस्त्यांची सध्या मोठी दुरावस्था झाली आहे. त्यासाठी भरीव निधीची आवश्यकता आहे. सिंचनाच्या प्रलंबित प्रश्‍नांसाठी हरणबारी डावा व उजव्या कालव्याचे नूतनीकरण, अप्पर पुनंद योजना, हरणबारी व केळझरच्या वाढीव कालव्यांकरीता निधीची तरतूद होणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

मतदारसंघातील दसवेल, चौगाव, उत्राणे, निताणे, कंधाणे यांसह अस्तीत्वात असलेल्या सर्व विद्युत उपकेंद्रांमध्ये ओवरलोड झाल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतीला पाणी देणे अशक्य होत आहे. या उपकेंद्रांची क्षमता वाढविणे गरजेचे असून, तालुक्यात अतिरिक्त ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्रांच्या उभारणीसाठी भरीव निधीची तरतूदही करण्याची आग्रही मागणीही श्रीमती चव्हाण यांनी निवेदनात केली आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT