Eknath Khadse & Amit Shaha Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse: ...एकनाथ खडसे अमित शहा यांना का भेटले असावे?

‘त्या’ चर्चेपेक्षा एकनाथ खडसे भाजपवापसी होणार याचाच गवगवा जास्त झाला.

Sampat Devgire

सचिन जोशी

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) त्यांच्या अमित शहांसोबतच्या (Amit Shaha) कथित भेटीची चर्चा मोठी ‘न्यूज’ बनते. याबद्दल चर्चा काहीही असो, पण.. खडसेंची शहांसोबत चर्चा झाली हे नाकारता येत नाही. राजकारणात काहीही शक्य असले तरी या कथित भेट अथवा चर्चेने खडसे पुन्हा भाजपवासी (BJP) होतील, असे समजण्याचे कारण नाही. (Eknath khadse will rejoin BJP is not possible at present)

एकनाथ खडसे यांचे विरोधक त्यांच्या राजकीय अस्तित्वावर कितीही प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत असले, तरी खडसे या नावामुळे मुक्ताईनगर राजकीय घडामोडींचे प्रमुख केंद्र असल्याचे आजही नाकारता येत नाही.

खरेतर एकनाथ खडसे नेहमीच राज्याच्या राजकारणात बातमीचा विषय राहिले आहेत. भाजप असताना फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी राज्यात ते क्रमांक एकचेच नेते होते. नंतरच्या काळात त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पक्षनेतृत्वावर नाराज होणे, ही नाराजी उघडपणे जाहीर करणे, विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारणे व मुलीचा पराभव.. या सर्वांचा परिणाम म्हणून त्यांनी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

या पक्षातही वर्ष, दीड वर्ष वाट पाहिल्यानंतर विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचे राजकीय पुनर्वसन झाले. राष्ट्रवादीतील काही वरिष्ठ नेते व स्थानिक नेत्यांचाही विरोध असताना पवारांनी खडसेंना विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्यामुळे पवारांची खंबीर साथ सोडून खडसे ज्या पक्षात त्यांची उपेक्षा झाल्याचा दावा ते करतात त्या पक्षात पुन्हा जातील, असे वाटत नाही.

मुक्ताईनगरात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह सर्वच नेत्यांना त्यांच्या भाषणात खडसेंवर टीका करणे भाग पडते, यातच खडसेंचे ‘मूल्य’ अधोरेखित होते. किंबहुना चंद्रकांत पाटलांनी केवळ खडसेंचा ‘समाचार’ घेण्यासाठीच एकनाथ शिंदेंना मुक्ताईनगरात आणले का, असाही प्रश्‍न निर्माण होतो. याच सभेतून खडसे अमित शहांना भेटल्याचा मुद्दा पुढे आला आणि नंतरचे तीन-चार दिवस खडसेंच्या भाजपवापसीबाबत चर्चेच्या बातम्या चालल्या. खडसेंनी त्याबाबत बाजू मांडली. शहांची भेट झाल्याचा इन्कार करत त्यांनी त्यांच्याशी चर्चा झाल्याचे स्पष्टपणे मान्य केले.

मुळात खडसे भाजपत असताना त्यांचे सर्वच केंद्रीय नेत्यांशी चांगले संबंध राहिलेत. फडणवीस मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर त्यांनी केवळ फडणवीस व चंद्रकांत पाटलांवरच टीका केली, मोदी-शहांविषयी खडसे कधीही काही बोलले नाहीत. किंबहुना केंद्रीय नेतृत्वाबद्दल त्यांचा काही आक्षेपच नव्हता. शहा केंद्रीय गृहमंत्री व सोबतच सहकार विभागाचे प्रमुखपदही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे व्यक्तिगत व सार्वजनिक अशा दोन्ही स्वरूपाच्या कामांसाठी खडसेंनी त्यांची भेट मागितली असेल, त्यांच्याशी चर्चा केली असेल तर त्यात वावगे नाही. त्यातून काही राजकीय अर्थ काढणे चुकीचे ठरेल. शहा-खडसेंमध्ये नेमकी काय चर्चा झाली त्यासंबंधी चर्चेपेक्षा या चर्चेचा गवगवाच अधिक होतोय.

रोहिणी खडसेंचा ‘तो’ पराभव

मुक्ताईनगरातील सभेच्या माध्यमातून आणखी एक गोष्ट समोर आली. नेहमीच दिलखुलास बोलणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी आमदार चंद्रकांत पाटलांचे कौतुक करताना त्यांना निवडणुकीत गिरीश महाजनांनी मदत केली, हेदेखील बोलून टाकले. रोहिणी खडसे भाजपच्या उमेदवार असताना पक्षातीलच काही लोकांनी त्यांना पाडल्याबाबत चर्चा होती आणि खडसेंनी राज्यातील नेतृत्वाकडे त्या वेळी तक्रारही केली होती. त्यावर आता अडीच वर्षांनंतर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जातेय.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT