Sakri Police station memorandam
Sakri Police station memorandam Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

साक्रीतील भाजपचे विजयी नगरसेवक बेपत्ता का झालेत?

Sampat Devgire

धुळे : साक्री (Dhule) नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालानंतर विजयी आणि पराभूत महिला उमेदवारांच्या मुलांतील वाद विकोपाला गेला. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर भाजपचे (BJP) विजयी उमेदवार, काही पदाधिकारी, कार्यकर्ते बेपत्ता झाले. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून तर शहराच्या राजकारणाचीही वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.

निकालानंतर भाजपकडून संबंधितांनी खोटा गुन्हा दाखल केल्याबाबत निवेदन दिले जात आहे. असे असताना साक्रीतील ‘ते’ संशयित अद्याप फरार का? हाही पोलिस तपासाचा मुद्दा ठरतो आहे.

भाजप कार्यालयात बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सत्कार सुरू असताना बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत महिला उमेदवाराचा मुलगा गोटू जगतास यास पिंपळनेर रोडवरील पुलाजवळ मारहाण केली जात होती. ही माहिती मिळाल्यानंतर त्याच्या सोडवणुकीसाठी बहिण माया पवार आणि चुलत बहिण मोहिनी जाधव, मायाचा मुलगा विषू, भाचा देव बाबर घटनास्थळी पोचले. त्यांनी मारहाणकर्त्यांना भावाला सोडून द्या, अशी याचना केली. मात्र, संशयित मनीष गिते, रमेश सरक, उत्पल नांद्रे व पाच ते सहा जण माया, मोहिनी व सोबत असलेल्यांनाही मारहाण करीत होते. अशात मोहिनीला पोटात, डोक्यात, पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याने ती खाली पडली व बेशुद्ध झाली. ते पाहून मारहाण करणारे पळून गेले व गर्दीमुळे पोलिस घटनास्थळी पोचले. पोलिस भाऊ गोटूला घेऊन दवाखान्यात गेले व आम्ही बेशुद्धावस्थेतील मोहिनीला रिक्षाने रूग्णालयात नेले. तेथे ती मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, अशा आशयाची फिर्याद साक्री पोलिस ठाण्यात माया पवार हिने दिली आहे.

साक्रीत दावे-प्रतिदावे

या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाने एलसीबीकडे तपास सोपविला. दुसरीकडे बरे झाल्यावर भटू जगताप याने सात जणांची नावे पोलिस जबाबात सांगितली. त्यात फोटो स्टुडिओधारक संघपाल मोरे, आधार बोरसे, ॲड. गजेंद्र भोसले यांच्यासह अन्य चार जणांची नावे समाविष्ट आहेत, तर फिर्यादी बहिणीच्या जबाबानुसार तीन नावे व पाच ते सहा जणांचा समावेश आहे.

एकंदर या गुन्ह्यात १६ संशयित असल्याचे समोर येते. यावरून तपास यंत्रणा विविधांगाने फिर्याद व जबाबांचा अभ्यास करत आहे. घटनेवेळी निर्माण झालेला राजकीय दबाव व त्यात धुळ्यातील भाजपच्या काही संशयितांची नावे समाविष्ट होऊ शकतात, असा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा रोख होता. मात्र, फिर्यादी माया पवार, भटू जगताप यांच्या जबाबात संशयितांची एकूण १६ नावे (सहा नावे निष्पन्न होणे बाकी) आली आहेत. यातही भाजपकडून राजकीय द्वेषाने काही नावे गोवल्याचा आरोप होत आहे. मग असे असताना शैलेश आजगे व अशासारखी अन्य काही नावे संशयितांच्या यादीत का समाविष्ट केली नाहीत, असा प्रश्‍न भाजपच्या विरोधी गटाकडून उपस्थित होताना दिसतो.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT