Jaykumar Rawal adressing BJP Morcha Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजपच्या शक्तिप्रदर्शनाने शिवसेना का झाली अस्वस्थ?

आक्रमक शिवसेनेला थोपविण्यासाठी शक्तिप्रदर्शन करू, ही भाजपची खेळी यशस्वी ठरली.

Sampat Devgire

डॉ. राहुल रनाळकर

नाशिक : गर्दी जमवली तर विरोधकांच्या मनात धडकी भरते आणि लोकांच्या मनात काहीप्रमाणात का होईना स्थान निर्माण होते. नाशिक शहरातील कायदा सुव्यवस्थेचं निमित्त साधून भाजपने (BJP) आक्रोश मोर्चा काढला. या निमित्ताने शहर ढवळून काढण्याची संधी भाजपने नक्कीच साधली. आक्रमक शिवसेनेला (Shivsena) थोपविण्यासाठी शक्तिप्रदर्शन करू, ही भाजपची खेळी यशस्वी ठरल्याचं या निमित्ताने ठळकपणे दिसून आलं.

या मोर्चानंतर शिवसेनेच्या गोटात थोडी का होईना अस्वस्थता पसरली. या अस्वस्थतेचं कारण स्पष्ट आहे. भाजप यंदाच्या निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरेल, हे स्पष्ट झालं. दुसरीकडे शिवसेनेच्या डोक्यात काहीअंशी का होईना गेलेली हवा आता हळूहळू कमी होईल. कुठल्याही स्थितीत महापालिकेवर आपला झेंडा फडकेल, असं जणू त्यांनी गृहीत धरलंय. आत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वास यांच्यातील सीमारेषा भाजपच्या मोर्चाने गडद केली. भाजप पुन्हा सत्ताप्राप्तीसाठी जंग जंग पछाडणार, हे स्पष्ट आहे. भाजप हा तसा कायम ‘इलेक्शन मोड’मध्ये असलेला पक्ष. मधल्या काळात शिवसेनेत काही जुने दिग्गज नेते दाखल झाले. त्यामुळे शहरात शिवसेनेची ताकद वाढली. पण ही सगळी मंडळी किती एकसंध आहेत, हे अजून समोर आलेलं नाही. भाजपमध्येही सुंदोपसुंदी आहेच. गट-तटांचं राजकारण तिथेही रंगत. पण आक्रोश मोर्चाचं निमित्त साधून आम्ही सगळे एकत्र आहोत आणि आमची ताकद अभेद्य आहे, हा स्पष्ट संदेश देण्यात भाजप नेत्यांना यश आलेलं आहे.

निवडणुकीत काय मुद्दे असतील हे एव्हाना स्पष्ट झालं आहे. कायदा-सुव्यवस्था कळीचा मुद्दा असेल, हे भाजपने या मोर्चाद्वारे अधोरेखित केलं. त्यासोबतच केंद्र सरकारच्या माध्यमातून मार्गी लागणारे विकासाचे मुद्दे लोकांसमोर अधिक सुसंगत रीतीने मांडण्याचा प्रयत्न असेल. अलीकडेच घोषणा झालेला आयटी पार्क आणि लॉजिस्टिक पार्क ही त्याची ठसठशीत उदाहरण. भाजपचा निश्चित असा एक मतदार वर्ग आहे. मध्यमवर्गीय लोकांमध्ये स्वतःची प्रतिमा ठसवण्यात भाजपला यापूर्वीच यश आलेलं आहे. शिवसेना मानणारा मोठा वर्ग नाशिकमध्ये आहे. भाजपला सत्ता देऊन झालं, आता आम्हाला पूर्ण सत्ता द्या, हा शिवसेनेचा मुद्दा असेल. जे प्रकल्प भाजपच्या अजेंड्यावर असतील, त्यातील ते मुद्दे खोडून काढत शिवसेनेला मैदानात यावं लागेल. अगदी निवडणुकीच्या तोंडावर प्रकल्पांची घोषणा करण्यासाठी भाजपची उडणारी तारांबळ जनतेच्या लक्षात येते. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत सत्तेचा सुमारे दोन वर्षांचा कालावधी भाजपकडे होता. पालकमंत्रिपद भाजपने उपभोगलं त्या काळात काय झालं, याचं उत्तर भाजपला द्यावं लागेल. भाजपला कोंडीत पकडण्याची संधी शिवसेना कशी साधणार, यावरही बरंच काही अवलंबून असेल.

भाजप आणि मनसेच्या मैत्रीच्या सुवार्ता अनेक दिवसांपासून ऐकायला येत आहेत. पण त्यातील निश्चित बातमी हाती यायला अजून थोडा काळ वाट पाहावी लागणार आहे. भाजप-मनसे युती झाल्यास भाजपचं नुकसान अधिक तर मनसेला जीवदान, अशी स्थिती राहण्याची शक्यता अधिक आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीबाबत अजून प्राथमिक चर्चाही सुरू झालेली दिसून येत नाही. गुप्त बैठकांच्या गुप्त बातम्याही अजून ठोसपणे समोर आलेल्या नाहीत. राज्यातील तीन पक्ष नाशिक महापालिकेत काय करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. भाजप-मनसे असो किंवा महाविकास आघाडी, या सगळ्यात कळीचा मुद्दा जागा वाटपाचा असेल. दोन्ही ठिकाणी समझोता साधण्यात किती यश येतं, यावर निवडणुकीतील प्रमुख समीकरण अवलंबून असतील. राजकारण राजकारणाच्या जागी ठेवून जनतेच्या हिताच्या मुद्द्यावर आणि नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने भूमिका मांडून जनतेचं लक्ष वेधून

घेण्याचं महत्कार्य सर्वपक्षीय नेतेमंडळींना करावं लागणार आहे. त्यामुळे येणारा काळ हा शहरासाठी, शहरातील नागरिकांसाठी आणि शहराच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे दिवस आणि रात्र दोन्ही वैऱ्याची आहे, असंच म्हणावं लागेल.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT