Hemant Godse & Amruta Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Loksabha; अमृता पवार ठरू शकतात लोकसभेच्या गेम चेंजर!

महाविकास आघाडीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे आणि शिवसेनेचे विजय करंजकर हे प्रबळ उमेदवार

Sampat Devgire

नाशिक (Nashik) मतदारसंघात भाजप (BJP) 34 वर्षानंतर कमळ चिन्हावर मैदानात उतरणार आहे. महाविकास आघाडीकडे (Mahavikas Aghadi) शिवसेनेचे (Shivsena) विजय करंजकर (Vijay Karanjkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) प्रबळ उमेदवार आहेत. मात्र त्यांचे यश `कसबा` (Kasba) पॅटर्नच्या इलेक्शन मॅनेजमेंटवर अवलंबून असेल. त्यात भाजपकडून (BJP) मराठा (Maratha) समाजातील फ्रेश चेहरा व भुजबळांचे (Chhagan Bhujbal) विरोधक म्हणून माजी खासदार (कै) वंसतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार (Amruta Pawar) यांचे नाव पुढे येऊ शकते. यात काहीच जर, तर नाही. हे घडल्यास त्या गेमचेंजर ठरू शकतात. (fresh candidate Amruta Pawar may be the first choice for BJP)

असा होता 2019 चा निकाल

युतीचे हेमंत गोडसे 2019 मध्ये दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यांना 5,63,599 (50.27 टक्के) मते मिळाली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे समिर भुजबळ 2,71,395 (24.21 टक्के) यांचा पराभव केला. यावेळी माणिकराव कोकाटे (अपक्ष) यांनी 1,34,527 (12 टक्के) तर वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार 1,09,981 (9.81) मते मिळाली. नरेंद्र मोदी यांची हवा आणि शिवसेना भाजप युती असली तरी गोडसे यांना निम्मी मते मिळाली होती. या मतदारसंघात 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेने सलग दोनदा विजय प्राप्त केला.

दहा निवडणुकांचा इतिहास

नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या 1980 ते 2019 या गेल्या दहा निवडणुकांत शिवसेना, भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला समान संधी राहिली आहे. 1984 मध्ये मुरलीधर माने आणि 1991 डॉ. वसंतराव पवार हे काँग्रेसचे तर 1998- माधवराव पाटील, 2004- देविदास पिंगळे, 2009- समिर भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. 1989- डॉ. डी. एस. आहेर हे भाजपचे तर 1996- राजाभाऊ गोडसे, 1999- अॅड. उत्तमराव ढिकले आणि 2014 आणि 2019 मध्ये हेमंत गोडसे या शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले.

राजकीय आडाखे...

शिवसेना आणि भाजप युतीचे पहिले उमेदवार डॉ. डी. एस. आहेर हे पहिले उमेदवार 1989 मध्ये विजयी झाले. त्यानंतर युतीच्या वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. थोडक्यात लोकसभेला गेली 34 वर्षे भाजपचे चिन्ह नव्हते. 2024 च्या निवडणुकीची तुलना 1999 आणि 2019 च्या निवडणुकीशी होऊ शकेल. 1999 मध्ये दोन्ही काँग्रेस स्वतंत्रपणे लढल्या. त्यात काँग्रेसचे गोपाळराव गुळवे, राष्ट्रवादीचे माधवराव पाटील आणि शिवसेना भाजप युतीचे उत्तमराव ढिकले उमेदवार होते. त्यात मतविभागणीचा लाभ घेत ढिकले विजयी झाले. यंदा शिवसेना-भाजप विभागलेली तर महाविकास आघाडीची भक्कम एकजुट व मदतीला वंचित आघाडी आहे. त्यामुळे चुरस असेल.

हेमंत गोडसे काय करणार?

आगामी 2024 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती फुटली आहे. शिवसेनेत फुट पडल्याने एकनाथ शिंदे गट स्वतंत्र झाला. हा गट भाजपकडे गेला आहे. मात्र त्याची एकुणच ताकद व जनमाणसातील प्रतिमा विचारात घेता भाजपला त्याचा किती लाभ होईल हे सांगता येत नाही. यामध्ये पहिला राजकीय धक्का विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना बसाण्याची शक्यता आहे. गोडसे त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये बंडखोरी, त्यांची इमेज त्यांचा प्लस पाँईंट की निगेटिव्ह हे मतदार ठरवतील. मतदारांना बंडखोरी करणारे विकासाच्या आड लपो की खरी-खोटी शिवसेना किती आवडतात, ते मतदानातून ठरेल. परंतु खासदार गोडसे यांना भाजप उमेदवारी देण्याची शक्यता कमी. त्याहून महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला भाजप नाशिकची जागा सोडण्याची शक्यता त्याहून कमी. यात बरेच काही आले.

महाविकास आघाडीचा कस

गेल्या (2019) निवडणुकीत युती एकसंघ व काँग्रेस आघाडी विभागलेली होती. त्यात कोकाटे यांची उमेदवारी छगन भुजबळ यांच्या राजकीय डावपेचाचा भाग होती. यंदा हे चित्र उलटे आहे. वंचित बहुजन आघाडी शिवसेनेबरोबर आहे. कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असुन दोन्ही काँग्रेस व शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी या लढतीत भाजप पूर्ण ताकदीनिशी उतरणार, त्यांच्या मागे `महाशक्ती` असेल मात्र शिवसेनेतील फुटीचे निगेटीव्ह वातावरण आणि शिवसेनेचा दुरावा या मर्यादा असतील.

`कसबा`ची पुनरावृत्ती होईल?

नुकत्याच झालेल्या पुणे शहरातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा विचार केल्यास महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलेला आहे. परंतु ही आघाडी ग्राऊंड लेव्हलवर नेत्यांचील एकोपा व समन्वय कसा निर्माण करते यावर बरेच काही ठरेल. कसबा विधानसभा निवडणुकीसारखी मॅनेजमेंट असेल तर 2024 मध्ये महाविकास आघाडीला निवडणूक अवघड नाही, असे कार्यकर्त्यांत बोलले जाते.

राजकारणाचे केंद्र मविप्र संस्था

या मतदारसंघात शिवसेना आणि भाजप यांच्या भोवती राजकारण फिरते आहे. त्यावर अनेक नेते आडाखे बांधत आहेत. विविध सुप्त राजकीय घडामोडी घडण्याची प्रक्रीया सुरु आहे. यामध्ये नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था हे देखील एक केंद्र आहे. विद्यमान सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे इच्छुक असुन ते भाजपचे मात्र त्याचबरोबर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्याशी संख्य ठेऊन आहेत. दुसरे प्रबळ इच्छुक म्हणजे `मविप्र`चे अध्यक्ष डॉ. सुनिल ढिकले. ते देखील भाजपचेच. त्यामुळे मविप्र संस्था हे सत्तेचे केंद्र ठरू शकते.

अमृता पवार गेम चेंजर?

गेल्या तीन निवडणुकांत नेहेमीच संभाव्य उमेदवार म्हणून `मविप्र`च्या माजी सरचिटणीस निलीमाताई पवार होत्या. आता त्या सक्रीय राजकारणापासून लांब आहेत. मात्र त्यांच्या कन्या आर्कीटेक्ट अमृता पवार जिल्हा परिषद सदस्या आहेत. त्या विक्रमी मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यांना माजी खासदार (कै) डॉ. वसंतराव पवार यांचा वारसा आहे. त्या भाजपच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवार ठरू शकतात. विरोधक म्हणून राजकारणात श्री. भुजबळ यांनी पवार कुटुंबाला नेहेमीच पाण्यात पाहिले आहे. मविप्र संस्थेच्या निवडणुकीत भुजबळ यांनी पडद्याआडून हस्तक्षेप केल्याचे लपुन राहिलेले नाही. ते अनेकांना आवडलेले नाही. अशा स्थितीत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटात गेलेले विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले भुजबळ हे दोघेही उमेदवारी आणू शकतात, मात्र मतदारांवर किती प्रभाव टाकतील हे गुलदस्त्यातच आहे. अशा स्थितीत अमृता पवार यांच्या नावाची चर्चा कार्यकर्त्यांत आहे.

आघाडीचे उमेदवार करंजकर की कोकाटे?

येत्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रबळ उमेदवार म्हणून जिल्हाप्रमुख विजय करंजकर, पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे हे स्पर्धेत आहेत. त्यात छत्रपती संभाजीराजे यांच्या नावाची भर पडली आहे. कसबा पोटनिवडणुकीचा प्रयोग म्हणून वंचित बहुजन आघाडीची 10 टक्के, आमदार कोकाटे यांची 12 टक्के आणि आमदार राष्ट्रवादीच्या समिर भुजबळ यांची 24 टक्के मतांची गोळाबेरीज व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कमी झालेला करीश्मा जोडीला शिवसेना फोडल्याने मतदारांत भाजपविषयीची नाराजी हे सर्व घटक 2019 च्या निवडणुक युतीतील भाजपच्या 50 टक्के अर्थात एक टक्का मतांच्या आघाडीची रेषा ओलांडतील काय? हे सांगायची गरज नाही.

भाजपचा उमेदवार कोण

विधानसभेच्या दृष्टीने हा मतदारसंघ निम्मा शहरी व निम्मा ग्रामीण आहे. मतदारसंख्येच्या दृष्टीने 67 टक्के शहरी व 33 टक्के ग्रामीण आहे. त्यात शहरातील देवयानी फरांदे, राहुल ढिकले आणि सीमा हिरे हे शहरातील तीन आमदार भाजपचे आहेत. आमदार कोकाटे (सिन्नर) आणि सरोज अहिरे (देवळाली) हे राष्ट्रवादीचे तर हिरामण खोसकर (इगतपुरी) हे काँग्रेसचे आहेत. या तिन्ही मतदारसंघात त्यांची लढत शिवसेनेच्या उमेदवाराशी होती. शहरात भाजपच्या आमदारांची लढत राष्ट्रवादी व शिवसेनेशी होती. ही स्थिती पाहता भाजपने या मतदारसंघाची बांधणी सुरु केली आहे. त्यांचा उमेदवार कोण यावर लढत व निकाल दोन्ही अवलंबून असेल. त्यात मराठा समाजातील फ्रेश चेहरा, राजकीय वारसा आणि मतदारसंघात संपर्क असलेल्या अमृता पवार सर्वाधिक चर्चेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT