Raj Thakre
Raj Thakre Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

राज ठाकरेंची `हिंदुत्वाची झुल` मनसेचा ग्राफ उंचावेल का?

Sampat Devgire

डॅा. राहुल रनाळकर

नाशिक : राजकीय दृष्ट्या राज ठाकरे (Raj Thakre) यांना हवंतसं यश गेल्या अनेक वर्षांत मिळालेले नाही. मनसेचा (MNS) ग्राफ सतत उतरता राहिला, हेलकावे खात राहिला. सध्या मनसेने हिंदुत्त्वाची झुल पांघरली आहे. राज यांच्या डोळ्यासमोर आगामी महापालिका (NMC) निवडणुकांचा रणसंग्राम असल्याचे स्पष्ट आहे. आता हा ग्राफ उंचावेल का हा उत्सुकतेचा विषय आहे. (Is Raj Thakre`s hindutwa will increase MNS graph)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर राज यांना महाराष्ट्रातील जनतेने कौल देत १३ आमदार निवडून दिले होते. नाशिकमध्ये महापालिकेची सत्ता राज यांच्या करिष्म्याने मनसेने हस्तगत केली होती.

देशभरात मोदींची लाट गेल्या ८ वर्षांपासून आहे. मोंदीचा चेहरा, निर्णय आणि वर्तणूक प्रखर हिंदुत्त्ववादाची असली तरी त्यांच्या भाषणांमध्ये हिंदुत्व फारसं डोकावत नाही. सर्वसमावेशक भूमिकेची मांडणी करत मोदींची वाटचाल सुरु आहे. राज ठाकरे यांनी सुरुवातीच्या काळात मोदींचे प्रचंड कौतुक केले. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकांत मोदींच्या विरोधात सभांचे रान उठवत भाजपाविरोधी प्रचार त्यांनी केला. यंदाच्या गुढीपाडव्यानंतर मात्र राज यांनी पुन्हा हिंदुत्वाची शाल पांघरली आहे.

राज यांची नजर जरी महापालिका निवडणुकांवर असली तरी देखील त्यांची थोडी गोची होईल, असंच दिसतंय. राज्यभरातील १८ महापालिकांच्या निवडणुका आता पावसाळ्यानंतर होणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे भोंग्यांच्या निमित्ताने जी हवा तयार झाली होती, ती टिकवून ठेवणं राज आणि मनसे दोघांनाही कठीण जाणार आहे. अर्थात हिंदुत्वाच्या नावाखाली नवीन मुद्द्यांची जुळवाजुळव करणं राज यांच्यासारख्या करिष्माई नेत्यांना फारसं अवघड जात नाही. भोंग्यांचा मुद्दा निकाली निघाला आहे. बहुतेक भोंग्यांचा आवाज कमी झाला असून अनेक ठिकाणी सकाळच्या प्रार्थना बंद झाल्या आहेत. विषय निकाली निघाला की मात्र मोठी अडचण होते. अर्थात नवीन मुद्दे शोधण्यासाठी धावाधाव करावी लागते.

राज ठाकरे यांच्या हिंदुवादी पवित्र्याचा मनसेला थेट निवडणुकीत कितपत फायदा होईल, हे निवडणुकांनंतर स्पष्ट होईल. तथापि, थेट मनसेला फायदा होण्याऐवजी शिवसेना आणि ज्या-त्या ठिकाणी प्रस्थापित पक्षांना नुकसान पोचवण्यावर मनसेचा अधिक जोर असेल. महापालिकांच्या निवडणुका म्हटल्यानंतर काही शे मतं देखील प्रभागाच्या निकालावर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे किती उमेदवार निवडून येतात, त्यापेक्षा किती उमेदवारांना पाडण्यात मनसे यशस्वी होईल, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष असेल. कदाचित या स्थानिक राजकीय गणितामुळे आठवलेप्रणित आरपीआय राज ठाकरे यांना सुरुवातीपासून विरोध करत आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भाजपासमर्थक पक्षांमध्ये मनसेच्या समावेशामुळे स्पर्धा वाढणार आहे. रामदास आठवलेंची ही प्रमुख अडचण असावी.

राज ठाकरे यांच्या भाषणाला गर्दी तुफान जमते पण त्यांना मतं का मिळत नाहीत, हा राजकीय अभ्यासकांचा आणि मनसेसाठीही चिंतन-मननाचा विषय आहे. मनसेला मतं न मिळण्याचा सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे पक्षांची बांधणी ज्या पद्धतीने व्हायला हवी ती झालेली नाही.

बूथ पातळीपर्यंत कार्यकर्त्यांची फळी आज जवळपास प्रत्येक पक्षाची कमी अधिक प्रमाणात आहे. भाजपा सदैव निवडणुकीसाठी तयार असलेला पक्ष आहे. तर बूथ पातळीपर्यंतची भाजपासारखी रचना शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांनी देखील अंगिकारली आहे. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर दणकट फळीचा अभाव हा मनसेसाठी नेहमीच आव्हानात्मक मुद्दा आहे. त्यावर मनसेने अद्याप मात केलेली नाही.

जनतेची नाळ ओळखून जनतेच्या कल्याणाचा मार्ग मनसेने सुरुवातीच्या काळात अंगीकारला होता, त्याला इथल्या जनतेने साथ देखील दिली. पण अधिकची सकारात्मकता अंगी बाणून सत्तेपर्यंत पोहोचता येणार नसल्याचा साक्षात्कार झाल्याने हिंदुत्त्वाची पताका राज यांनी खांद्यावर घेतली आहे. या भूमिकेतील सातत्य आणि संघटनात्मक पायाभरणी राज कशी करतात, हे देखील पक्षाच्या भवितव्यासाठी महत्त्वाचे ठरेल.

भोंग्यांच्या मुद्द्यामुळे एक सकारात्मक बाब राज्यभरात अधोरेखीत झाली. हा मुद्दा एवढा तापला होता, की दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होते की काय, अशी स्थिती होती. पोलीस यंत्रणेने ही स्थिती अतिशय समर्थपणे हाताळली. वातावरण तापल्यामुळे राज यांनी देखील हा प्रश्न धार्मिक नसून सामाजिक आहे, अशी भूमिका घेतली. कारण कुठेही दंगल उद्भवली असती तर तो डाग जड गेला असता. यातील सकारात्मकता म्हणजे समाजातील जाणत्या वर्गाची विवेकबुद्धी अजूनही शाबूत असल्याचे स्पष्ट झाले. अगदी सामोपचाराने अनेक ठिकाणी भोंगे उतरवण्यात आले. डेसिबलची मर्यादा पाळली गेली. बऱ्याच ठिकाणी सकाळची प्रार्थना बंद झाली. महाराष्ट्र अन्य काही राज्यांपेक्षा वेगळा का ठरतो, हे इथल्या जनतेने दाखवून दिले. त्यामुळेच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जरी काही धार्मिक मुद्दे उकरुन काढण्यात आले, तरी त्यांना जनता किती साथ देईल, हे भोंग्यांच्या मुद्द्याने स्पष्ट केले आहे. अर्थात राज यांचा पुढचा महिना शस्त्रक्रिया आणि त्यानंतर तब्येत पूर्ववत करण्यात जाईल. जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर राज पुन्हा सक्रिय झाल्यास ऑगस्ट आणि सप्टेंबर हे महिने त्यांच्याकडे आहेत. कार्यकर्त्यांचे मोहोळ लाभलेला हा नेता त्यामुळे पुढे कसा राजकीयदृष्ट्या मार्गक्रमण करेल, हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल. गर्दी जमवण्यात यशस्वी होणाऱ्या मनसेला मतांची बेगमी करण्यासाठीही कष्ट घेण्याशिवाय पर्याय नसेल, हे देखील तेवढंच खरं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT