Gulabrao Patil & Unmesh Patil
Gulabrao Patil & Unmesh Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

खासदार उन्मेष पाटील यांच्या गद्दारीची परतफेड करू!

Sampat Devgire

पाचोरा : खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांना लोकसभेची उमेदवारी उशिरा मिळाली असतानाही शिवसेनेचे (Shivsena) सर्वार्थाने बळ दाखवून त्यांना विजयी केले. आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे केले. मात्र, त्याची कदर न बाळगता खासदारांनी गद्दारी केली. माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते आले नाहीत व नंतरही सातत्याने शिवसेनाविरोधी भूमिका घेत आहेत. खासदारांच्या या गद्दारीची येणाऱ्या निवडणुकीत परतफेड करू, असा सेना स्टाईल इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिला. (Will taught a lesson to MP Unmesh Patil for his betrayal with Shivsena)

येथील महालपुरे मंगल कार्यालयात शिवसंपर्क अभियानाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शिवसेनेचे उपनेते तथा जिल्हा निरीक्षक लक्ष्मणराव वडले, आमदार किशोर पाटील, संपर्क परमुख संजय सावंत यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, की सध्या काही स्वार्थी राजकारणी राम व हनुमानाच्या नावे नारे लावून शिवसेनेला बदनाम करीत आहेत. तसा ठेका अनेकांनी घेतला असून, बाळासाहेबांची शाल पांघरली, म्हणून आपण बाळासाहेब झालो, असे कोणी समजू नये, यांचे भोंगे कधीच बंद झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शिवसेनेने समाजातील प्रत्येक घटकासाठी केलेल्या विकासात्मक कामांचा, राबविलेल्या ध्येयधोरणांचा आढावा घेतला.

ते पुढे म्हणाले, आगामी निवडणुका कार्यकर्त्यांच्या असून त्यासाठी जिद्दीने कामाला लागून शिवसेनेची एक हाती सत्ता प्रस्थापित करावी, असे आवाहनही त्यांनी केले. आमदार किशोर पाटील यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर कडाडून टीका केली. गुलाबराव वाघ, लक्ष्मणराव वडले, संजय सावंत, विष्णू भंगाळे यांची भाषणे झाली.

दरम्यान, युवासेनेतर्फे महालपुरे कार्यालयापासून दुचाकीरॅली काढण्यात आली. महाराणा प्रताप चौकात रॅलीचा समारोप झाला. यावेळी महानगरप्रमुख शरद तावडे, उपसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्शल माने, शेतकरी सेनेचे अरुण पाटील, उपमहापौर कुलभूषण पाटील, सुनील पाटील, डॉ. विशाल पाटील, संजय पाटील, विराज तावडे, सुमीत पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT