Chhagan Bhujbal & Sambhaji Pawar
Chhagan Bhujbal & Sambhaji Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भुजबळांच्या येवल्यात राष्ट्रवादी-शिवसेनेत सलोख्याचे पर्व!

Sampat Devgire

येवला : पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मतदारसंघात शिवसृष्टी प्रकल्पाचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत झाले. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सत्तेवर आल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादी (NCP) व शिवसेनेचे (Shivsena) स्थानिक सर्व नेते एका व्यासपीठावर आले. त्यामुळे हा सोहळा भविष्यात या दोन पक्षांतील दिलजमाई आणि सलोख्याचे पर्व निर्माण करणारा ठरेल काय, अशी चर्चा सुरु आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन, त्याला सर्व स्तरांतील नागरिकांची उपस्थिती आणि विविध स्तरातील नागिरकांनी केलेले कौतुक वैशिष्ठय होते. येवल्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून झालेल्या कौतुकाने संयोजक भारावले. या कार्यक्रमाचे इव्हेंट मॅनेजमेंट महत्वाचे ठरले. या सूक्ष्म नियोजनात भव्य व्यासपीठ, पार्किंग, जाण्या-येण्याचे नियोजन, प्रत्येकाला बांधलेला फेटा आणि ठोल-ताशांच्या गजरात झालेले आदरातिथ्य यामुळे या कार्यक्रमात कुणी काय उणीव शोधावी, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यासाठी माजी खासदार समीर भुजबळ यांची कल्पकता आणि आठवड्यापासून त्यांचे कट्टर विश्वासू दिलीप खैरे यांनी सभास्थळी नियोजनासाठी घेतलेली मेहनत नक्कीच कारणीभूत आहे.

आखीवरेखीव नियोजनाचे कौतुक करावे तेवढे थोडेच असताना राजकीयदृष्ट्याही ही सभा नवे पर्व निर्माण करणारी ठरू शकेल. येथे प्रत्येक विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगतो. त्यातच राज्यात हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र आल्याने स्थानिक पातळीवर तरी असे काही मनोमीलन झालेले नव्हते.

महाविकास आघाडी असली तरी येथील शिवसेनेचे प्रमुख नेते आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, युवा नेते संभाजी पवार, माजी आमदार कल्याणराव पाटील व इतर सर्वच पदाधिकारी भुजबळांच्या सर्व कार्यक्रमांपासून दूरच राहिले होते. कुठल्या सभा किंवा बैठकाही एकत्रित झाल्याचे चित्र गेल्या तीन वर्षांत दिसले नाही. मात्र सोमवारचा कार्यक्रम यासाठी जरा वेगळाच ठरला. उद्‌घाटनाची एक जाहिरात सोशल मीडियावर पडली आणि त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो नसल्याची खदखद पहिल्या टप्प्यात व्यक्त झाली आणि येथूनच भुजबळांनी लागलीच शिवसेनेलाही सोबत घेण्याच्या सूचना दिल्या. स्वतः दिलीप खैरे यांच्यासह येथील संपर्क कार्यालयाचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांनी शिवसेनेसह काँग्रेस व शिवप्रेमी संघटनांच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले आणि सर्वजण उपस्थित देखील राहिले.

विशेष म्हणजे पवार कुटुंबीयांची वर्षानुवर्षे सलोख्याचे संबंध असलेले येथील माजी आमदार मारोतराव पवारदेखील या निमंत्रणाचा स्वीकार करून अजितदादांना भेटण्यासाठी उपस्थित राहिले हे विशेष! त्यामुळे व्यासपीठावर आमदार दराडे बंधूंसह येथील माजी आमदार मारोतराव पवार व ज्येष्ठ सहकार नेते अंबादास बनकर या तीनही प्रमुख नेत्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. तर ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांची अनुपस्थिती मात्र खटकणारी होती.

विकासकामांच्या बाबतीत भुजबळांकडून शिवसेनेचे आमदार दराडे बंधू व संभाजी पवार यांना सहकार्य होत असते. पण भुजबळांच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शिवसेनेची उपस्थिती हे चित्र दुर्मिळ होते. ते काल दिसल्याने सर्व जणांची उपस्थिती भुवया उंचावणारी ठरली. आगामी काळात पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बँक, बाजार समित्या या सर्वच संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने कालचा सोहळा त्यासाठी फीलगुडचे वातावरण निर्माण करणारा ठरेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना लागली आहे. २००४ नंतर प्रथमच अजित पवार उद्‌घाटनासाठी येथे आले आणि त्यांच्या समोरच एकोप्याचे दर्शन घडल्याने नक्कीच राज्य पातळीवर देखील यातून चांगला संदेश जाणार, हेही तितकेच खरे!

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT