Suhas Kande Entry in Yeola Politics : मंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यात दिवाळी आधीच राजकीय फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे. येवल्यात, नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी दिवाळी शुभेच्छांचे डिजिटल फलक लावले असून नागरिकांना भेटवस्तू आणि शुभेच्छापत्रांचे वाटप केलं आहे. त्यामुळे येवल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
आगामी विधानसभा निवडणुकांना बराच अवधी असताना येवल्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. येवल्यात, आमदार सुहास कांदे यांची दिवाळीच्या निमित्ताने ' डिजिटल ' शुभेच्छा देण्याच्या माध्यमातून झालेली एन्ट्री चर्चेचा विषय ठरली आहे. सुहास कांदे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांसह नागरिकांना दिवाळीचे गिफ्ट व शुभेच्छा पत्रे पाठवली आहेत. त्यामुळे सुहास कांदे यांची येवला मतदारसंघात राजकीय चाचपणी सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे. एकंदरीत घडामोडी पाहात यंदाच्या दिवाळीत राजकीय फटाक्यांची आतषबाजी रंगत वाढवणारी ठरणार असे एकूण चित्र दिसतेय..
येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे गेल्या पाच टर्मपासून प्रतिनिधित्व मंत्री छगन भुजबळ करत आहे. तर मतदारसंघात त्यांचे चिरंजीव आमदार पंकज भुजबळ व पुतणे माजी खासदार समीर भुजबळ हे सक्रिय आहे. त्यांच्याविरोधात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे तयारी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे दराडे कुटुंबीयांच्या राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी यंदाच्या दिवाळीत थेट येवला लासलगाव मतदारसंघातच शुभेच्छांचा 'धडाका' लावल्याने राजकीय चर्चांना नवी फोडणी मिळाली आहे.
आमदार सुहास कांदे यांनी संपूर्ण येवला मतदारसंघात दिवाळी शुभेच्छांचे फलक लावले, अनेक पदाधिकारी नागरिकांना भेटवस्तू दिल्या आणि घराघरांत शुभेच्छा पत्रिकांचे वाटपही केले. त्यामुळे येवल्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा मिळाल्या खऱ्या; पण राजकीय निरीक्षकांच्या डोक्यात मात्र वेगळेच फटाके फुटू लागले आहेत.
आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की, शिवसेनेतून येवल्याच्या राजकीय मैदानात कुणाल दराडे यांचीच एन्ट्री होणार की सुहास कांदे यांनीही या मतदारसंघात राजकीय चाचपणी सुरू केली आहे? दराडे यांच्या उमेदवारीच्या चर्चेला कांदे यांच्या दिवाळी मोहिमेमुळे नवा ट्विस्ट मिळाला आहे का? की हा केवळ सणासुदीच्या शुभेच्छांचा सामाजिक उपक्रम आहे?
येवल्यात यंदा दिवाळीचे दिवे अनेकांनी लावले; पण राजकीय चर्चेची वात मात्र आमदार सुहास कांदे यांच्या शुभेच्छा मोहिमेमुळे पेटली आहे. त्यामुळे दराडेंचा पत्ता कट होतो की काय अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, कुणाल दराडे हे सध्या कोणत्या पक्षात आहेत, याबाबत मोठा संभ्रम आहे. यापूर्वी ते शिवसेना ठाकरे गटात होते. मात्र, त्यांचे कुटुंबीय शिवसेना शिंदे पक्षात आहे. त्यामुळे कांदेंनी येवल्यात हालचाली वाढवल्यास दराडेंची अडचण होण्याची शक्यता आहे.
एकीकडे कुणाल दराडे विधानसभेची तयार करत असताना आता शिवसेनेतून सुहास कांदेंही येवल्याची चाचपणी करु पाहत असल्याची चर्चा आहे. आता या राजकीय आतषबाजीचा पुढचा अंक कोणता, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.