Ex MLA Rashid Shaikh & MLA Maulana Mufti Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`एमआयएम`च्या तंत्रापुढे हतबल काँग्रेस मालेगावमध्ये खल्लास!

मालेगाव हा देशभरातील काँग्रेससाठी सावधगिरीचा इशारा.

Sampat Devgire

नाशिक : बुधवारी काँग्रेसचा (Congress) मालेगाव (Malegaon) हा बालेकिल्ला राजकीयदृष्ट्या ध्वस्त झाला. यात निधी व नेत्यांचे दुर्लक्ष हे आरोप वरवरचे आहेत. खरेतर गेली काही वर्षे येथे `एमआयआम`ने अत्यंत विखारी प्रचारतंत्र राबवले होते. दुसरीकडे भाजपचे (BJP) अल्पसंख्यांकावरील वैचारीक हल्ले `एमआयएम`ला अनुकुल ठरत होते. या तंत्राला सामोरे जाण्यात काँग्रेसची सर्व शश्त्रे बोथट ठरत होती. यातूनच संपूर्ण काँग्रेसच्या तंबूवर पंजाचा झेंडा गेला व घड्याळ फडकले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यात काँग्रेस एक घटक पक्ष आहे. विरोधकांकडून होणारे सर्वाधिक राजकीय हल्ले काँग्रेसवर होतात. त्या प्रमाणात पक्षविस्तारासाठी काँग्रेसचे मंत्री पुरेसे काम करतात का? याचे जे उत्तर ती काँग्रेस पक्षाची स्थिती व भविष्य.

मालेगाव शहरात दोन प्रकारचा मुस्लीम समाज आहे. त्यात उत्तर भारताशी संबंध असलेले मोमीन आणि दखनी अर्थात स्थानिकांशी नाळ जोडलेले दखनी. मोमीन गटाचे नेतृत्व `एमआयएम`चे आमदार मौलाना मुफ्ती तर दखनींचे नेतृत्व काँग्रेसचे माजी आमदार शेख रशीद यांच्याकडे परंपरेने राहिले आहे. एकेकाळी जो सामाजिक कट्टरवाद होता तो मध्यंतरी नाहीसा होत आला होता. भाजपचा विशिष्ट प्रचार व त्यातून `एमआयएम`ला तयार झालेले अनुकूल वातावरण. यामुळे कट्टरवादाने पुन्हा उचल खाल्ल्याचे चित्र झाले.

या प्रचारात बाबरी मशीद केंद्रस्थानी आहे. एमआयएम काँग्रेसला त्यासाठी दोष देते. भाजप देखील हाच प्रचार बहुसंख्यकांत करते. याचे नेमके उत्तर काँग्रेसला सापडलेले नाही. त्याला कसे सामोरे जावे याचे उत्तर काँग्रेसला सापडत नव्हते. याची मोठी झळ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकसभा व अन्य निवडणूकांत सोसली आहे. भाजपचा आक्रस्ताळेपणा व त्यातून एमआयएमच्या एककल्ली प्रचाराने धार्मिक ध्रृविकरणास मदत होते. मालेगाव शहरात देखील तेच घडत होते. त्यातून मोठा गट विशेषतः युवा वर्ग पारंपारीक काँग्रेस सोडून एमआयएम कडे वळला. त्यात टिकून राहणे अवघड होऊ लागल्याचे बोलले जाते. त्याला जे आक्रमक उत्तर काँग्रेसकडून अपेक्षीत आहे, तसे नेतृत्व त्या पक्षात नाही. आज देखील या पक्षात नाना पटोले वगळता अन्य नेते काही गुळमुळीत बोलून वेळ मारून नेतात. हे असेच सुरु राहिले तर भाजप त्याच्या तंत्रात यशस्वी होत जाईल. मालेगाव त्या दृष्टीने देशभरातील काँग्रेससाठी इशारा आहे.

काल झालेल्या पत्रकार परिषदेत शहरात गेल्या तीन दशकांपासून काँग्रेसची धुरा सांभाळणारे माजी आमदार रशीद शेख, महापौर ताहेरा शेख यांच्यासह महापालिकेतील काँग्रेसचे सर्व २८ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. श्री. शेख यांनी मंगळवारी हजारखोली भागातील संपर्क कार्यालयात नगरसेवकांची बैठक पार पडल्यानंतर या प्रवेशासंदर्भात घोषणा केली. २७ जानेवारीला मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे. त्यातील कारणे फार वरवरची आहेत. खरी कारणे सांगणे शेख यांनाही राजकीयदृष्ट्या अडचणीचेच आहे. त्यामुळे काँग्रेसला एक वैचारीक व आक्रमक बैठक तयार करण्याची गरज आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT