Nagpur ex Corporators
Nagpur ex Corporators Sarkarnama
विदर्भ

Nagpur : नागपुरातील माजी नगरसेवक गणोशोत्सवाचा असा घेणार लाभ !

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : गणेशोत्सवापासून अगदी दिवाळीपर्यंत उत्साहाच्या वातावरणाचा लाभ घेण्यासाठी माजी नगरसेवकांनी कंबर कसली आहे. गणेशोत्सवात दहा दिवस कुठल्या मंडळांकडे जायचे, कुठे किती वेळ द्यायचा याबाबत अनेक माजी नगरसेवकांनी कार्यक्रम पत्रिकाच तयार केल्याचे दिसून येते. एवढेच नव्हे काही माजी नगरसेवकांनी मंडळांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमही उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे.

नागपूर (Nagpur) महापालिकेत प्रशासकाची नियुक्ती होऊन येत्या चार सप्टेंबरला सहा महिने पूर्ण होत आहेत. या सहा महिन्यांच्या काळात काही अपवाद सोडले तर अनेक नगरसेवक नागरिकांपासून दुरावले. माजी नगरसेवक फोनही उचलत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे महापालिकेने (Municipal Corporation) दहाही झोनमध्ये तक्रार निवारण केंद्र सुरू केले होते. परंतु, या काळातही काही माजी नगरसेवकांनी लसीकरण शिबिर, आरोग्य शिबिरासारखे उपक्रम राबवून नागरिकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला. मात्र, अशा नगरसेवकांची (Corporator) संख्या अत्यल्प आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून जे माजी नगरसेवक गायब होते, त्यांनी आता गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत संपर्क अभियानाचा कार्यक्रम तयार केला. प्रभागात किती मंडळांनी सार्वजनिक गणेश मूर्तीची स्थापना केली. संबंधित गणेशोत्सवात किती लोक दररोज येतात. त्यावरून किती काळ त्या गणेश मंडळाच्या कार्यक्रमात द्यायचा, याबाबत कार्यक्रमाची रूपरेषाच तयार केली आहे. काही माजी नगरसेवकांकडूनही गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. याशिवाय प्रभागातील किती नागरिकांकडे गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली, त्यांच्याकडेही भेटीचा कार्यक्रम निश्चित केला गेला आहे.

काही माजी नगरसेवकांनी मंडळांना सांस्कृतिक कार्यक्रम देण्यासाठीही पुढाकार घेतला. काही उपक्रम राबविण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे. गणेशोत्सवातून मतदार, नागरिकांशी थेट संपर्क साधून महापालिका निवडणुकीसाठी स्वतःचा पाया भक्कम करण्यासाठी एकाच प्रभागात स्पर्धाही दिसून येत आहे. गणेशोत्सवानंतर दुर्गोत्सव, दिवाळीतही माजी नगरसेवकांकडून विविध कार्यक्रमांसाठी नियोजन केले जाणार आहे.

मदत व्हाया खासदार सांस्कृतिक महोत्सव

केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी (Nitin gadkari) यांच्या संकल्पनेतील खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीने गणेश मंडळांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. माजी नगरसेवकांनी नेमका हाच धागा पकडून काही गणेश मंडळांना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी देण्याची योजना आखली. यात अनेकांना यशही आल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT